मुरबाड: गेल्या १५ दिवसांपासून उन्हाची काहिली वाढली आहे. त्यामुळे सध्या नागरिक उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी बाजारातील प्रक्रिया केलेल्या थंड पेयांऐवजी आरोग्यदायी कलिंगडांना पसंती देत आहेत. मुरबाड तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी पट्ट्यात तसेच शहरी भागात वीस रुपये किलो दराने हे कलिंगड विकले जात आहेत.
उपवासासाठी आवर्जून खाल्ली जाणारी कलिंगडे शेतात तयार झाली असून ग्राहकांना उपलब्ध झाली आहेत. मुरबाड तालुक्यातील शिरगाव परिसरात काही शेतकरी कलिंगडाची शेती करतात. या शेतांच्या जवळच मुरबाड-वासिंद रस्त्यावर ही कलिंगडे विक्री साठी ठेवण्यात आली आहेत. शेताजवळच रस्त्यांवर मांडव टाकून कलिंगडांची विक्री केल्याने वाहतुकीचा खर्च, तसेच हमालीचा खर्च वाचतो. त्यामुळे वीस रुपये किलो प्रति दर मिळाला तरी आम्हाला चांगला फायदा होतो असे येथील शेतकरी सांगतात.
या कलिगडांचे वजन ४ किलो ते १२ किलो पर्यंत आहे. कलिंगडे तोडल्या नंतर ती सुकवल्यामुळे त्यांचा दर्जा उत्तम होतो. ती चवीला रवाळ आणि गोड लागतात. पण त्यामुळे त्यांचे वजन घटते. या कलिंगडांना दर्जा उत्तम असूनही कमी वजनामुळे कमी पैसे मिळतात. तरीही ग्राहकांना समाधान मिळते म्हणून आम्ही कलिंगड सुकवून मगच विक्रिसाठी ठेवतो असे शिरगाव येथील शेतकरी बळीराम भवार्थे यांनी सांगितले.
पूर्वी मुरबाड तालुक्यात किशोर, असोले, करवेळे तसेच मुरबाड शहरातील काही भागात कलिंगडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जायची. साधारण, भात पिकाची कापणी झाली की त्यानंतर शेतात कलिंगडाची लागवड केली जात असे. यालाच ‘कलिंगडाची काशी’ असे म्हणतात. यात गावातील दोन तीन शेतकरी एकत्र येऊन कलिंगड लागवड करायचे आणि त्यानंतर तयार झालेली कलिंगडे विक्री होई पर्यंत त्यांचा मुक्काम शेतामध्ये व मांडवात असायचा.
महाशिवरात्रीच्या सुमारास फळे तयार होत असत व बैलगाडीतून ती विक्री साठी बाजारात आणली जायची. या कलिंगडाच्या पिकांना खत म्हणून गुरांचे शेण, खाटी वापरली जात होती. त्यामुळे फळांचा गर एकदम घट्ट व चवीला गोड लागायचा, असे शेतकरी सरल गायकर यांनी सांगितले. सध्याच्या काळात रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे कलिंगडे पचपचीत आणि चवीला सुमार असतात. त्यामुळे पारंपरिक कलिंगडांची लागवड किती महत्वाची आहे हे यावरुन समजते.