कुडाळ (प्रतिनिधी ): कुडाळ तालुक्यातील अणाव घाटचे पेड पुलाचे राहिलेले अर्धवट काम येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करा अन्यथा आमच्या पद्धतीने काम पूर्ण करून घेऊ, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. अणाव घाटचे पेड पुलाची पाहणी माजी खासदार निलेश राणे यांनी आज (सोमवारी) केली. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
अणाव घाटचे पेड पुलाचे काम गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे. या अर्धवट कामामुळे ग्रामस्थांची मोठी हेळसांड होत आहे. या अर्धवट राहिलेल्या कामाची पाहणी माजी खासदार निलेश राणे यांनी केली. या पाहणी दरम्यान सार्वजनिक बांधकामचे अधिकारी तसेच या पुलाचे ठेकेदार उपस्थित होते. पुलाची पाहणी केल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व पुलाचे ठेकेदार यांना चांगलेच धारेवर धरले. पाच वर्षे तुम्ही काय करत होता. या पुलाचे काम पूर्ण का होत नाही. कारणे आणि सबब सांगू नका. काम पूर्ण झाले पाहिजे. स्थानिक आमदार व खासदार तुमचे लाड पुरवतील पण मी ऐकून घेणार नाही ही जनता आमची आहे. ग्रामस्थांची हेळसांड थांबली पाहिजे. या अर्धवट पुलाच्या कामामुळे शाळकरी मुलांना चार ते पाच किलोमीटर फिरून शाळेत जावं लागत आहे. तुम्हाला त्याची काय लाज वाटते की नाही? हे पुल कधी पूर्ण होणार ते लेखी स्वरूपात द्या जर त्या कालावधीत हे पुल पूर्ण झाले नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने काम करू, असे त्यांनी सांगितले.
यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्या. ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कोणालाही जुमानत नाही. गेली पाच वर्ष या पुलाचे काम केले जात आहे. अर्धवट असलेल्या पुलामुळे आम्हा ग्रामस्थांना तसेच आमच्या शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले तर यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांनी येत्या मे महिन्यापर्यंत या पुलाचे काम पूर्णत्वास जाईल असे सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष दादा साईल, जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, विनायक अणावकर, नारायण गावडे, श्री कांदळगावकर, भाजपचे कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे, भाजप नगरपंचायतीचे गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभी गावडे, बांव माजी सरपंच नागेश परब तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.