केप टाऊन (वृत्तसंस्था) : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघावर बक्षीसांचा पाऊस पडला आहे. सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ८.२७ कोटी रुपये जमा झाले आहेत. उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला ४.१३ कोटी रुपये मिळाले.
उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या प्रत्येक संघाला १.७३ कोटी रुपये दिले गेले. ग्रुप टप्पा पार करू न शकलेले संघही रिकाम्या हाताने घरी परतले नाहीत. २४.८३ लाख रुपयांव्यतिरिक्त, सर्व संघांना गट सामने जिंकण्यासाठी प्रति सामना १४.४८ लाख रुपये मिळाले आहेत. त्यानुसार, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सुमारे २.२५ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेसह मायदेशात परतला आहे. आयसीसीने महिला टी-२० विश्वचषक २०२३ ची बक्षीस रक्कम आधीच जाहीर केली होती. या स्पर्धेत एकूण २०.२८ कोटी रुपयांची बक्षीसे दिली जाणार होती.
रिचा घोषला ‘टीम ऑफ टूर्नामेंट’मध्ये स्थान
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धा नुकतीच संपन्न झाली असून या स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची ‘टीम ऑफ टूर्नामेंट’ जाहीर करण्यात आली आहे. रिचा घोष या एकमेव भारतीय खेळाडूला या संघात स्थान देण्यात आले आहे.
ताजमीन ब्रिट्स (दक्षिण आफ्रिका), अॅलिसा हिली (ऑस्ट्रेलिया), लॉरा वोल्वार्ड (दक्षिण आफ्रिका), नॅट सिव्हर ब्रंट (इंग्लंड), अॅशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया), रिचा घोष (भारत), सोफी इक्स्टोन (इंग्लंड), करिश्मा रामहार्क (वेस्ट इंडिज), शबनिम इस्माईल (दक्षिण आफ्रिका), डार्सी ब्राउन (ऑस्ट्रेलिया), मेगन शुट (ऑस्ट्रेलिया) या खेळाडूंना आयसीसी टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये स्थान देण्यात आले आहे. तर आयर्लंडच्या ओरला प्रेंडरगास्टचा १२वा खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.
लॅनिंगने मोडला पाँटिंगचा विक्रम
ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या रिकी पाँटिंगचा मोठा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची कर्णधार मेग लॅनिंगने मोडला आहे. लॅनिंग ही सर्वात मोठ्या आयसीसी स्पर्धा जिंकणारी कर्णधार बनली आहे. लॅनिंगने आतापर्यंत ५ स्पर्धा जिंकल्या आहेत. तिच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने चार टी-२० विश्वचषक आणि एक एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर पाँटिंगने त्याच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाला चार आयसीसी ट्रॉफी मिळवून दिल्या. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दोन एकदिवसीय विश्वचषक आणि दोन आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्या आहेत.