कोल्हापूर: कोल्हापूर येथील कणेरी मठाच्या धर्तीवर कोकणात देखील गोशाळा निर्माण करण्याचा आपला विचार आहे. मी स्वतः तब्येत ठीक नसताना देखील केवळ या लोकोत्सवातून ऊर्जा घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो, अशा शब्दांत केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ येथे सुरु असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवात आपले मनोगत व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये तसेच प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण व्हावं यासाठी हा सोहळा मार्गदर्शक ठरणार आहे. गेल्या सात दिवसांमध्ये या ठिकाणी लाखो नागरिक येऊन गेले. इथं आलेला प्रत्येक माणूस काही ना काही चांगलं शिकून बाहेर पडला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ येथे सुरु असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाची आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या अध्यक्षतेखाली सांगता झाली. गेल्या सात दिवसांपासून अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनात कणेरी मठात हा पंचमहाभूत लोकोत्सव सोहळा सुरू होता. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यासह इतर राज्यातील लाखो नागरिकांनी या सोहळ्यात उपस्थिती लावली. या महोत्सवातून पर्यावरण रक्षण तसेच सेंद्रीय शेतीचा जागर करण्यात आला.