मुंबई: कोण होणार करोडपती’, या बहुचर्चित कार्यक्रमाचे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला असून प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची चांगलीच उत्सुकता आहे. ‘एक मिस्डकॉल द्या आणि २ कोटी जिंका’, असे म्हणत या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट करण्यात आला आहे. ज्ञान आणि बुद्धी यांच्या जोरावर करोडपती होण्याची अनोखी संधी देणाऱ्या ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या यंदाच्या पर्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विजेत्याला २ कोटी रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.
करोडपती होण्याचे स्वप्न प्रत्येकजण पाहतो. पण सर्वसामान्यांचे हे स्वप्न सत्यात उतरण्याची संधी ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळते. ‘कोण होणार करोडपती’च्या आधीच्या सगळ्या पर्वांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मनोरंजनासोबत ज्ञानार्जन हे वैशिष्ट्य असणाऱ्या कार्यक्रमात ज्ञान यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाऊ शकते, याची प्रचिती मागील पर्वामुळे आली आहे. ‘करोडपती’च्या आगामी पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा सचिन खेडेकर सांभाळणार आहेत. अभिनय कौशल्याबरोबरच सचिन खेडेकर सहभागी स्पर्धकांशी प्रेमळ संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचे काम मोठ्या खुबीने करतात.
कार्यक्रमात सहभागी होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. दर वर्षीप्रमाणे मिस्डकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षक सहभागी होण्यासाठी नोंदणी करू शकतात. ‘करोडपती’चे नवे पर्व कधीपासून सुरू होणार हे अद्याप समजलेले नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.