
- मुक्तहस्त: अश्विनी पारकर
लेखामध्ये दोन फोटो वापरले आहेत. एक फोटो सोनू निगमवर सेल्फीसाठी नुकत्याच झालेल्या हल्ल्याचा आणि दुसरा या पाच निरागस लहान मुलांचा ज्यांच्याकडे सेल्फी घेण्यासाठी स्मार्ट फोन नाही, तरीही चक्क चप्पल, स्मार्टफोन असल्याची कल्पना करून ते स्वत:च्याच बालविश्वात सेल्फीचा आनंद घेत आहेत. दोन्ही फोटोत बोलके आहेत.
पहिला फोटो असं सांगतो की, मोठी माणसं त्यांच्याहून व्यक्तिमत्त्वाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींसोबत सेल्फी काढण्यासाठी कोणत्या थराला जात आहेत. स्वत:चा आनंद मिळवण्यासाठी ही माणसं दुसऱ्याला त्रास द्यायलाही मागे नाहीत. तर दुसऱ्या फोटोत ही लहान मुलं लहान गोष्टीतूनही मोठा आनंद घेत आहेत.
सध्या चर्चेत असलेल्या सेल्फी प्रकरणांत महत्त्वाची बाब म्हणजे मग्रुरी. सोनू निगमसोबत जो प्रकार घडला त्यात ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांचा मुलगा स्वप्नील फातर्फेकर याचा सहभाग होता. प्रकाश फार्तेकर यांनी चेंबूर फेस्टिव्हलचे आयोजन केले होते, ज्यात सोनू निगमचा लाईव्ह कार्यक्रम होता, कार्यक्रमानंतर सोनू निगम स्टेजवरून खाली उतरताना सोनूने सोबत सेल्फी घेण्यास नकार देताच त्याने सोनू, सुरक्षारक्षक आणि सोनूची महिला सेक्रेटरी हिला धक्काबुक्की केली. माझ्या वडिलांच्या कार्यक्रमात मला सेल्फी द्यायला नकार देतो म्हणजे काय? हा अहंकार या धक्काबुक्कीत दडलेला आहे. पृथ्वी शॉवरही हल्ला करणारी तरुणीही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. ती आणि तिचा मित्र याने हे प्रकरण दाबण्यासाठी पृथ्वी शॉच्या मित्राला देऊ केलेली लाच हा पैसा, संपत्ती आणि सोशल मीडियावर मिळालेल्या झटपट प्रसिद्धीचाच गर्व आहे.
तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीला कार्यक्रमासाठी बोलवता तेव्हा तुम्ही त्यांना खरेदी करत नाहीत. ते त्यांची कला त्या वेळेकरिता सादर करण्यासाठी आलेले असतात आणि ते फक्त त्याच अन् त्याच गोष्टीचा मोबदला घेतात, हे तुम्ही ध्यानात ठेवले पाहिजे. पण, बॉलिवूड आणि सेलिब्रिटींचा हा सेल्फी सासुरवास काही नवा नाही. या आधी कितीतरी सेलिब्रिटींना सेल्फीसाठी त्यांच्या चहात्यांकडून धक्काबुक्की झाल्याचं समोर आलं आहे. खुद्द बिग बी यांनीच याचा निषेध नोंदवला होता. सेल्फी घेण्यासाठी ज्या सेलिब्रिटींसोबत आपण सेल्फी घेतोय त्यांचा अनादर करणं किती घृणास्पद आहे, या आशयाचं हे ट्वीट होतं. बिग बींना इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा अँग्री यंग मॅन व्हायला लावणाऱ्या या सेल्फीप्रेमी चाहत्यांच्या वेडेपणावर आता इलाज करण्याची वेळ आली आहे. हा इलाज करण्यासाठी हे सेल्फीचं वेड कुठून आलं याचा मागोवा आपण घेऊ.
असं म्हणतात की, सेल्फी या शब्दाचा शोध २००३ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये लागला. त्यानंतर २१ व्या शतकात ऑक्सफर्ड डिक्शनरीनेही सेल्फी या शब्दाला जगमान्यता दिली. भारतातील पहिला सेल्फी १९८० मध्ये त्रिपुराचे संस्थानिक महाराजा बीर चंद्र माणिक्य यांनी त्यांची पत्नी महाराणी खुमान चानू मनमोहिनी देवी हिच्यासोबत घेतला होता. अर्थात स्वत:चा फोटो घेण्याची हौस त्यावेळी या संस्थानिकांनाच परवडणारी होती. आता मात्र स्मार्टफोनने ज्याच्या हाती स्मार्टफोन तोच जणू राजा असे या सेल्फीप्रेमींचे वर्तन असते. सेल्फीच्या नादात आपण दुसऱ्याला इजा करतो आहोत याचंही भान या सेल्फी संस्थानिकांना नसते. त्यामुळे यावरचा उपाय शोधताना तुमच्या-आमच्यापैकी जे सेलिब्रिटींच्या मागे वेडे आहेत, त्या प्रत्येक चाहत्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण सेल्फी काढतो, ते कसे काढतो हेही समजून घेण्याची आवश्यकता आहे.
सेल्फी या शब्दात सेल्फी लव्ह हा अर्थ दडलेला आहे. पण सेल्फ लव्हचा प्रवास नार्सिसिस्ट वागण्यापर्यंत कधी होतो हे तुम्हालाच कळत नाही. स्वत:वरील आंधळ्या प्रेमात तुम्ही इतके मश्गुल होता की, सतत सेल्फी घेत राहता. ते सोशल मीडियावर पोस्ट करत राहता. मग त्याच्यावर किती लाईक्स, कमेंट्स येतात हे पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा सोशल मीडिया अकाऊंट चेक करत राहता. यातून पुढे सेल्फीचे अॅडिक्शन अन् मग इतर मानसिक आजारांचा ससेमिरा मागे लागतो. यात महत्त्वाचा आजार आहे ओसिडी म्हणजे सतत एखादी गोष्ट अथवा कृती करत राहणे. ती इतक्या प्रमाणात करणे की ती केल्याशिवाय चैन पडत नाही. मानसिक आजारांमधील सर्वात समान्य झालेले आजार अॅन्झायटी आणि डिप्रेशन यालाही तुमचे अतिसेल्फी लव्ह कारणीभूत ठरते.
याला आवर घालायचा कसा?
साधी गोष्ट आहे. स्वत:वर प्रेम करण्याची व्याख्या आपण समजून घेतली पाहिजे. म्हणा ती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. पण जी आरोग्यदायी तीच योग्य व्याख्या. तुम्ही फक्त फोटोत चांगले दिसण्यापेक्षा तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक अधोरेखित कसे होईल, यावर मेहनत घेतली पाहिजे. त्यासाठी एखाद्या आवडीच्या छंदामध्ये मन गुंतवणं हा चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमची कौशल्ये विकसित करण्यासाठी मेहनत घेऊ शकता. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी व्यायाम, ध्यानधारणा करू शकता. तुम्ही स्वत:ला मानसिक, शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या आरोग्यदायी कसे ठेवता, यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व सुंदर दिसते. बरं तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचे चाहते असता तेव्हा त्या गोष्टीची काळजी घेण्याला तुम्ही प्राधान्य देता. मग तुम्ही तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीसोबत सेल्फी घेत आपण किती महान आहोत हे दाखवण्याची ईर्ष्या का करता? तीही दोन डोळे, एक नाक आणि दोन कान असलेली माणसं आहेत. मग त्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा, वावरण्याचा अधिकार आहे, हे समजून घ्यावसं तुम्हाला वाटतं नाही का? हे असे प्रश्न तुम्ही स्वत:ला विचारणं सुरू कराल तेव्हा ती तुमच्या आत्मपरीक्षणाची सुरुवात असेल. जर तुम्हाला यातूनही असं जाणवत असेल की, आपल्याला आपले अॅडिक्शन सोडवण्यासाठी मदतीची गरज आहे, तर तुम्ही तज्ज्ञांच्या मदतीने यातून बाहेर पडू शकता. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लेखाची जिथून सुरुवात झाली ते समजून घ्या. तुमचा आनंद तुम्ही कोणत्या गोष्टीत शोधता यावरून तो किती निर्भेळ आहे, हेच महत्त्वाचे आहे आणि हेच सेल्फीप्रेम सोडून स्वत:वरती प्रेम करायची सुरुवात आहे.
yaprisu February 26, 2023 05:33 PM
अगदी बरोबर