Friday, May 9, 2025

कोलाज

तेरे दरपर सनम...

तेरे दरपर सनम...

  • नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे


'फिर तेरी कहानी याद आयी' (१९९३) हा महेश भट आणि निर्माते जॉनी बक्षी व नितीन केणी यांचा सुंदर सिनेमा! त्यात राहुल रॉय, पूजा भट्ट, पूजा बेदी आणि अवतार गिल यांच्या भूमिका होत्या. जय दीक्षित यांच्या कथेत व्यसनाच्या आहारी गेलेला एक तरुण सिनेदिग्दर्शक (राहुल रॉय) व्यसनमुक्तीसाठी एका पुनर्वसन केंद्रात पोहोचतो. तिथे त्याला सिझोफ्रेनियाने ग्रस्त असलेली एक मुलगी (पूजा भट्ट) भेटते. त्यांच्यात सुरुवातीला झालेल्या थोड्याशा वादावादीनंतर मैत्री होते. दोघांच्या निरागस वागण्यामुळे पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. मात्र पूजाचा आजार बळावतो आणि तिला मनोरुग्णांच्या इस्पितळात दाखल करावे लागते.


राहुलला तिचा विरह असह्य असतो, त्यात रेडिओवर बातमी येते की, त्या इस्पितळाला मोठी आग लागली आणि त्यात सर्व रुग्णांचा मृत्यू झाला. ‘सर्व रुग्ण भाजून मरण पावले’ म्हणजे पूजाचाही मृत्यू झाला असणार, हे लक्षात आल्याने राहुल मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतो! त्याला पूजाला विसरणे अशक्य असते! तिची पहिली भेट... त्यांच्यात झालेली पहिली वादावादी. नंतरचे तिचे लहान मुलाइतके निरागस वागणे... त्यातून स्वाभाविकपणेच वाढत गेलेल्या प्रेमातील एकेक प्रसंग... असे सर्व राहुलला आठवत राहते. त्याचा भाऊ आणि मैत्रीण असलेली सहकारी अभिनेत्री (पूजा बेदी) त्याला सावरण्याचा खूप प्रयत्न करतात, पण त्यांना यश येत नाही. एक दिवस राहुलला अचानक पूजाच्या आवाजातले फोन येऊ लागतात. फोनवरची व्यक्ती म्हणत असते, ‘राहुल, मी पूजा आहे आणि लवकरच तुला भेटायला येणार आहे.’


शेवटी असे स्पष्ट होते की, इस्पितळाला लागलेली ती भयंकर आग पूजानेच लावली होती, इस्पितळात राहायचे नसल्याने तिने हे टोकाच्या वेडेपणाचे पाऊल उचलले होते! आपल्या हातून केवढा अनर्थ घडलाय हे लक्षात आल्यावर ती पळून जाते आणि पोलिसांची नजर चुकवत जगत असते. राहुलला येणारे फोन तिचेच असतात!


पुजाच्या प्रेमात बुडालेला राहुल वास्तवाचे भान विसरून पूजाला पोलिसांपासून वाचवण्यासाठी तिला येऊन मिळतो. लोकांची नजर चुकवत दोघे जीव वाचवत जंगलातून फिरत असताना पोलिसांच्या तावडीत सापडतात. तेव्हा विमनस्क पूजा कळवळून सांगते, ‘मला राहुलबरोबर राहायचे आहे. कृपा करून मला इस्पितळात नेऊ नका.’ तिचे कुणीच ऐकत नाही. एका क्षणी वेडाच्या भरात ती पोलीस इन्स्पेक्टरच्या हातातून पिस्तूल हिसकावून घेऊन स्वत:ला गोळी मारून घेते. राहुल आणि तिच्या आजोबांना अगतिकपणे डोळ्यांसमोर तिचा मृत्यू बघावा लागतो.


सिनेमाचा शेवट असा करुण असल्याने कदाचित, सिनेमा फार चालला नाही. पण सर्वांच्या जबरदस्त अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर चांगलाच ठसा उमटवून गेला. राहुल रॉयला पाहताना अगदी तरुण वयातला सलमान, संजय दत्त आठवतात. त्यांचा सुरुवातीचा उत्स्फूर्त, निरागस अभिनय आठवतो. कथेला दिलेल्या पाश्चिमात्य सिनेमासारख्या ट्रीटमेंटमुळे सगळे स्वाभाविक आणि खरे वाटते. नेहमीचा फिल्मी अतिरेकीपणा कुठेच दिसत नाही.


जेव्हा जेव्हा पूजाला अस्वस्थ वाटते, एकटेपणाची भीती वाटू लागते, कुणीतरी आपल्याला ठार मारणार, असे भास होतात तेव्हा ती काळ-वेळेचे भान विसरून राहुलकडे धावत येत असते. काय करावे ते तिला सुचतच नाही. ज्या मानसिक रुग्णाला या प्रकारचे भास होतात त्याला जीवघेणी भीती सतत घेरून असते. अशा रुग्णाच्या भयंकर आणि तितक्याच करुण मनस्थितीचे वर्णन एक गाणे लिहून करणे किती अशक्य काम असेल त्याची आपण कल्पनाच करू शकतो. पण कतील शिफाई यांनी हे आव्हान लीलया पेलल्याचे गाणे ऐकताना लक्षात येते. गाण्याच्या पहिल्या ओळीतच पूजाच्या प्रेमाची निरागसता व्यक्त होते. ज्या असाध्य आजारामुळे तिला कुणावर, कशावरच विश्वास ठेवता येत नाही, त्यातून आलेले टोकाचे मानसिक परावलंबित्व सिझोफ्रेनियाच्या रुग्णाला कसे अगतिक करून टाकते ते कतील शिफाई यांनी सुंदरपणे मांडले आहे. थकलेली, घाबरलेली, प्रेयसी प्रियकराकडे एकमेव आधार म्हणून येताना म्हणते, ‘मी एखाद्या याचकासारखी तुझ्या दारावर आले आहे रे! तू तर माझ्याकडे आला नाहीस म्हणून मीच आधार शोधत तुझ्या दारात आले, बघ!’


तेरे दरपर सनम,
चले आये,
तू ना आया तो हम, चले आये...


यातले ‘तू ना आया तो हम, चले आये’ हे शब्द खूप अस्वस्थ करून टाकतात. किती करुण, दयनीय अवस्था! तरीही जगण्याची केवढी धडपड, प्रेमावरचा केवढा विश्वास! हे सगळे आपल्यालाही अस्वस्थ करून टाकते.


पूजा मुळातच एक भावुक, हळवी मुलगी आहे. ती राहुलच्या प्रेमात अगदी बुडाली आहे. ज्या भयंकर रोगाने ती ग्रस्त आहे, त्यातून आलेल्या वेदनादायी अनुभवांनी आयुष्याला विटली आहे. अशा स्थितीत तिला आपल्या जीवलगाची साथ किती महत्त्वाची वाटेल! जीवनात दुसरी कोणतीच इच्छा शिल्लक राहिलेली नाही, ती फक्त प्रेमासाठी अक्षरश: तहानलेली आहे. कुठे जावे ते समजत नाही. धड दिशाही कळत नाहीत, चालताना पावले अडखळत आहेत, तरीही ती राहुलच्या दारात पोहोचते.


बिन तेरे कोई आस भी ना रही,
इतने तरसे के प्यास भी ना रही...
लडखडाए कदम, चले आये...


मनोविकारात रुग्णाचे स्थळ-काळाचे भान जाते. त्यांना एकटेपणाचे जीवघेणे भय वाटते. रात्र तर खायला उठते. अशा असह्य भीतीचा (फोबिया) अॅटॅक येतो, तेव्हा सगळी जाणीवच एखाद्या नागिणीसारखी डंख मारू लागते.


इससे पहले के हमपे हँसती रात,
बनके नागिन जो हमको, डसती रात,
लेके अपना भरम चले आये...
तू ना आया तो हम, चले आये...


ती म्हणते, ‘लेके अपना भरम’ चले आये! आता याचा अर्थ तुझे प्रेम मला लाभले आहे हाही एक भ्रमच होता. असे तिला वाटते आहे, की वास्तवाचे भान हरवून टाकणाऱ्या त्या आजाराने निर्माण झालेले वेगवेगळे विभ्रम तिला सतावताहेत? तिला यातले नेमके काय म्हणायचे आहे ते संदिग्धच राहते. अर्थात ते तसे राहणे कथेला पोषकच ठरते. गाण्यात शेवटी पुन्हा त्याच ओळी येत राहतात तेव्हा डोळे पाणावतात -


तेरे दरपर सनम
चले आये,
तू ना आया तो हम, चले आये...


‘फिर तेरी कहानी याद आयी’ ज्यांनी पाहिला आहे त्यांना सिनेमाचे नाव सार्थ करत ती हळवी कहाणी पुन्हा पुन्हा आठवतच राहणार!

Comments
Add Comment