Friday, May 9, 2025

कोलाजमहत्वाची बातमी

भारताची विज्ञान प्रगती

भारताची विज्ञान प्रगती

  • गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी


भारतीय भौतिक शास्त्राचे सी. व्ही. रमण यांच्या उल्लेखनीय कार्याचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने भारताच्या विज्ञान प्रगतीचा अल्पसा हा आढावा.


भारताचे मंगळयान पहिल्या प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत शिरताच जगभर जल्लोष झाला होता. आपल्या वैज्ञानिकांनी कोविड-१९ वर लस शोधून कोविड आटोक्यात आणला. या गोष्टी सोप्या नाहीत की योगायोग नाही. अनेक वर्षांच्या भारतीय वैज्ञानिकांच्या विज्ञानाचे फलित आहे. याच कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षण, घरून काम करताना सर्वांची संगणकाशी मैत्री झाली. अनेक भारतीयांच्या आंतरराष्ट्रीय संशोधनामुळे भारताची जगात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.


प्राचीन काळापासून भोवतालचे जग आणि निसर्ग जाणून घेतानाच पर्यावरणातल्या साधन-संपत्तीची, निसर्गातल्या काही घटकांची माहिती झाली. तिचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करावा, हा विचार करतानाच मानवाचे जीवन सुखी आणि सुरक्षित करण्यासाठी एक साधन म्हणून विज्ञानाकडे पाहिले गेले.


विज्ञान! विशेष ज्ञान! जिज्ञासा आणि कुतूहलातून विज्ञानाचा जन्म झाला. विज्ञान अनुभूतीवर, साक्षात्कारावर विश्वास ठेवत नाही. अनेक अंधश्रद्धांमागचे विज्ञान प्रकाशात आणले गेले. वैज्ञानिक सत्य हे वास्तवतेवर आधारित आहे. विज्ञान विश्वासार्ह आहे म्हणूनच जगाने स्वीकारले.
चाक, अग्नी आणि ध्वनी (भाषा)च्या प्राथमिक शोधानंतर, पृथ्वीच्या उदरात खनिजे मिळाली. जैवतंत्रज्ञानाद्वारे संकरित बियाणांचा वापर करून हरितक्रांतीने भारत अन्नधान्य उत्पादनांत स्वयंपूर्ण आहे. आज भारतात ऑरगॅनिक फार्मिंग, हर्बल मेडिसिनचा वापर वाढला आहे. धवलक्रांतीत ‘ऑपरेशन फ्लडच्या’ आधुनिकीकरणामुळे जगात दूध उत्पादनात भारत आघाडीवर आहे. नीलक्रांतीत गोड्या, खाऱ्या पाण्यातील मत्स्य उत्पादनासाठी, जलसंवर्धनासाठीही आणि भारताला तिन्ही बाजूने लाभलेला समुद्र किनाऱ्याचे संरक्षण / संवर्धनासाठी (ब्लू इकॉनाॅमी) केंद्राने खास तरतूद केली आहे. आज बायोगॅस घराघरात पोहोचलाय. विज्ञानाने मानवाचे दैनंदिन जीवन, राहणीमान पूर्णतः बदलले आहे.
२०वे शतक हे क्रांतिकारक वैज्ञानिक विचारांचे मानले जाते. या शतकात व्यावहारिक विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. क्ष किरण, हृदयरोपण, चंद्रावर पाऊल, रेडिओ, दूरदर्शन, संगणक, भ्रमणध्वनी पहिल्यांदा अनुभवले.


२१व्या माहिती तंत्रज्ञानाच्या शतकांत, वेगवान प्रगतीमुळे क्रांतिकारक बदल घडले. नॅनोतंत्रज्ञान, कृत्रिम जीवनिर्मिती, विश्वनिर्मितीचा महास्फोट स्वातंत्र्यापासून भारत विकासाच्या मार्गावर चालत असला तरी गेल्या १० वर्षांत सर्व क्षेत्रातील विज्ञानवेग वाढला आहे.
आज सारे जीवन, सारे व्यवसाय विद्युत ऊर्जेवर अवलंबून आहेत. विद्युत ऊर्जेमुळे आज रात्रीही मानव कामात व्यग्र आहे. ऊर्जेची वाढती गरज, कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी, ऊर्जा निर्मितीच्या विविध योजनेत (पाणी, सौर, सीनजी, विद्युत) “राष्ट्रीय हाइड्रोजन मिशन”ला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.


भूगर्भ संशोधनातून शोधलेली पहिली तेल विहीर (बॉम्बेहाय). आज सर्वत्र दिसत असलेल्या उंच इमारती, उड्डाणपूल, भूमिगत बोगदे ही अभियांत्रिकीची कमाल! विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दळणवळण क्षेत्रात प्रगत संशोधनाच्या मदतीने (बुलेट ट्रेन, मेट्रो) शहरे, गावे वेगाने जोडली जात आहेत. (समृद्धी महामार्ग). देशांत हवाई वाहतुकीचे जाळे अनेक पटीने विस्तारले आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासातून होणारी आर्थिक उलाढाल, गरजेनुसार वाढणाऱ्या नवीन उद्योगव्यवसायाला लागणारी यंत्रसामग्री, विज्ञानाला चालना देते. त्यातून रोजगार निर्माण होतो. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास विज्ञान तंत्रज्ञानावर अवलंबून असतो.


विज्ञान तंत्रज्ञानाच्या साथीनेच भारताच्या युवापिढीने ऑलिम्पिकमध्ये यश मिळविले. प्रत्येक खेळात खेळाडू, संघ, प्रशिक्षक विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरतात. भारताने अवकाश क्षेत्रात स्वबळावर प्रगतीची मोठी झेप घेतली आहे. भारत ‘‘इंडियन रिमोट सेन्सिंग’’च्या माध्यमातून अवकाशांत सोडलेल्या उपग्रहांमार्फत शेतजमीन, पाणी, हवामान, नैसर्गिक आपत्ती यांची माहिती घेत त्याचा नेमका उपयोग करून घेतो. परम संगणकाच्या निर्मितीने जगाला भारताची बौद्धिक ताकद दाखवून दिली. गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यासासाठी नासामार्फत महाराष्ट्रात हिंगोली येथे ‘लिगो इंडिया’ प्रकल्प उभा राहत आहे. देशाच्या संरक्षणासाठी स्वबळावर लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, वायरलेस संप्रेक्षण क्षेत्र यांची ताकद खूप वाढली आहे. ‘समर्थ भारत ’!


जन्म आणि रूप आपल्या हातात नाही, प्लास्टिक सर्जरी, टेस्ट्यूब बेबीने यावर यश मिळविले. कृत्रिम पद्धतीच्या अवयव रोपणाने अपंगांना उभारी मिळाली. अनेक असाध्य रोगांवर मात केल्याने मानवाचे आयुष्य वाढले आहे.


आज मानव जमीन, पाणी, आकाशांत सहजपणे विहार करू शकतो. जी-२०चा एक भाग म्हणून २०२३च्या जानेवारीत झालेल्या आंतराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सवांत ‘मानवाच्या कल्याणासाठी विज्ञान’ या विषयाशी निगडित चित्रपट होते. त्यानिमित्ताने विद्यार्थी, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ एकत्र आले. आज चित्रपट क्षेत्राची सारी अंगे विज्ञानानेच व्यापली आहेत.


भारतात प्रत्येक विषयाशी संबंधित भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था आहेत. सध्याचे ‘हवामान बदल’ हे एक मोठे आव्हान असून त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी शेतीत आणि सामाजिक क्षेत्रात नवीन प्रयोग, नवीन संशोधन होणे गरजेचे आहे. भारतातील ‘आयआयटी’ ही विज्ञान शिक्षणातील जगभरातील एक आदर्श शिक्षण संस्था.


आज मोबाइल, संगणकाच्या वापरामुळे पूर्ण जग एकाच मंचावर आले आहे. घरबसल्या अनेक कौशल्य शिकू शकतो. काही सेकंदात माहिती मिळते. आज विज्ञानामुळे कुणाशीही दूरचे बोलू, पाहू, ऐकू शकतो. तसेच तिन्ही ऋतूत जगणे सुसह्य होते. प्राचीन काळीही विज्ञान होते. श्रीरामाचा सेतू, अजंठा-वेरूळ लेणी, बौद्ध धर्मियांचे सभा मंडप याचा आज वैज्ञानिक अभ्यास करीत आहेत.


उल्लेखनीय अशा भारताच्या प्रगतीत आजही काही भागांत पाणी, वीज, सार्वजनिक आरोग्य, रस्ते, कुपोषण हे प्रश्न तीव्र आहेत. पर्यावरणावर घातलेला घाव पाहता निसर्गही आपल्याला त्याचे अस्तित्व एक दिवस दाखवू शकतो. विज्ञानाच्या सोयी उपभोगताना जपून वापरा, पर्यावरणाचे
भान ठेवा. विज्ञान शाप का वरदान हे आपल्याच हाती!


एकेकाळी गुहेत राहणाऱ्या मानवाने, संरक्षणाचे साधन नसताना, शोध घेत, संशोधन करीत, उत्क्रांतीचे टप्पे गाठत बुद्धीच्या जोरावर विश्वाचे रहस्य उलगडले. असा हा भारतीय विज्ञान प्रगतीचा चढता आलेख !!


[email protected]

Comments
Add Comment