Friday, May 9, 2025

किलबिल

सदुपयोगी श्याम

सदुपयोगी श्याम

  • कथा: प्रा. देवबा पाटील


सोनगाव नावाचे एक छोटेसे गाव होते. याच गावात रामराव व सीताबाई नावाचे एक जोडपे आपल्या लहानशा झोपडीवजा घरात राहात होते. ते परिस्थितीने खूप गरीब होते. दोघेही खूप कष्टाळू होते. आळसाला त्यांच्या जीवनात मुळीच थारा नव्हता. कष्टकरी तो पोट भरी, रिकामा फिरी तो उपाशी मरी हे तत्त्व ते दोघेही जाणून होते. त्यानुसार वागत होते.


रामराव गावातील कुणाही गरजवंतास आपल्या परीने होईल तसे सहकार्य करायचा. एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ या न्यायाने त्याच्यासोबत कामास येणाऱ्या एखाद्या दुर्बल कामक­यास स्वत:चे काम करून त्याच्या कामात मदत करायचा. सीताबाईही गावातील स्त्रीयांना परोपरीने मदत करायची. त्यामुळे या गरीब जोडप्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आपुलकी व आदरभाव होता.


रामराव व सीताबाई हे दोघेही ईश्वराविषयी अतोनात निष्ठा बाळगणारे होते. भगवान श्रीकृष्णाचे तर ते निस्सिम भक्त होते. बाळकृष्णाच्या मंदिराच्या बांधकामाच्या वेळी त्या उभयतांनी एक पैसाही मजुरी न घेता तेथे रात्रंदिवस अतिशय कष्टाची कामे उपसली होती. अशाच एका गोकुळअष्टमीच्या दिवशी रात्री १२ वाजता बाळकृष्णाच्या जन्मानंतर उत्सवाची सांगता होणार होती. रात्री सारी बायामाणसं श्रीकृष्णाच्या भजनात मग्न झालेली होती. हे दोघेही भजनांतील गोपाळकृष्णाच्या लीला ऐकण्यात तल्लीन असताना मंदिरातच सीताबाईंनी एका गुटगुटीत अशा बाळाला जन्म दिला. गोकुळअष्टमीस बाळाचा जन्म झाला म्हणून त्याचे श्याम असे नाव ठेवण्यात आले.


हळूहळू श्याम मोठा होऊ लागला. रामरावाच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्याने श्यामला बालपणापासूनच छोटी-छोटी कामे करावी लागली. आई-बाबांचा परोपकाराचा गुण त्याच्याही रक्ताच्या थेंबाथेंबात उतरला होता. त्यामुळे लहान वयातच तो गावात सगळ्यांचा आवडता झाला होता. एकदा श्याम असाच गावात संध्याकाळच्या वेळी आपल्या मित्रांसोबत लपाछपीचा खेळ खेळत होता. तो एका अडचणीच्या ठिकाणी मित्रांची नजर चुकविण्यासाठी लपून बसलेला होता. तोच त्याला एक गलेलठ्ठ बाई किराणा दुकानातून सामानाने खच्च भरलेल्या दोन मोठमोठ्या पिशव्या घेऊन आपला तोल सावरत बाहेर येतांना दिसली.


ती बाई कोण आहे, हे काही त्याला माहीत नव्हते. श्याम त्या अडगळीतून बाहेर आला. त्या बाईजवळ गेला नि विनम्रतेने म्हणाला, मावशी, लय जड दिसत्यात त्या पिशव्या. द्या त्या माझ्याजवळ. मी तुमच्या घरापर्यंत घेऊन जातो. नाही, नाही, राहू दे. मी नेते हळूहळू. ती बाई म्हणाली.


द्या ना मावसी. तुमाले चाल्याले लय तरास होऊन रायला. असे म्हणत त्याने तिच्या हातातील पिशव्या मागून आपल्या हाती घेतल्या व तिच्या मागोमाग चालू लागला. चालता चालता त्या बाईने त्याची सगळी विचारपूस केली. श्यामने त्या बाईस तिच्या घरापर्यंत पिशव्या पोहोचवून दिल्या.


त्या दिवशी संध्याकाळी त्या बाईने आपले पती सर्जेराव जमीनदार घरी आल्यानंतर त्यांना श्यामने तिला केलेल्या सहकार्याबद्दल सांगितले. रामराव आल्यानंतर जमीनदाराने त्याला श्यामने त्याच्या पत्नीस केलेल्या मदतीची माहिती सांगितली नि म्हणाले, रामराव, तुझ्या कष्टाळू प्रवृत्ती व सोज्वळ स्वभावाची मला चांगली माहिती आहेच. तू माझ्याकडे शेतीच्या साऱ्या कामांसाठी सालदार म्हणून राहतो का? सालदार म्हणून राहिल्यास तुला काम नाही आणि मजुरी नाही असा एकही दिवस उगवणार नाही. मालक, तुमी म्हणता तेबी खरं हाय म्हणा. सालदार म्हणून राहिलो तर काम नायी अन् मजुरी नायी असतं कायी हुनार नायी. तुमी सांगा कामाले कवापासनं येऊ? रामरावने विचारले.


उद्या सकाळपासूनच तू कामाला ये. जमीनदार सांगू लागले, सकाळी तुला मी माझ्या वाड्यावर सगळ्या कामाची रूपरेषा समजावून सांगतो. दुस­ऱ्या दिवसापासून रामराव सर्जेराव जमीनदाराच्या शेतावर सालदार म्हणून कामास लागला. जमीनदारीणबाईंनी सांगितल्याप्रमाणे सीताबाईही त्याच जमीनदाराच्या घरी जमीनदारीणबाईच्या हाताखाली घरगुती कामे करायची. अशा रीतीने श्यामने बालपणीच केलेल्या सदुपयोगी परोपकाराने, इतरांच्या कामात मदत करण्याच्या प्रवृत्तीने त्याच्या आई-वडिलांना कायमचे काम मिळाले. त्यांचा मजुरीचा प्रश्न सुटला, त्यांची उपासमार दूर झाली व त्यांनी श्यामचेही नाव शाळेत टाकले.

Comments
Add Comment