- स्वयंसिद्धा: प्रियानी पाटील
ऑफिसमधून जेव्हा रूमकडे आली तेव्हा पाहिलं, तर इंजिनीअरिंग कॉलेजची मुलं सारी एका टेबलवर बसून गप्पा मारत बसलेली. त्यांच्याभोवती गडबडीने रूमची मालकीण त्यांच्या जेवणाचा बेत आखत राहिलेली.
‘तुला काय हवं, तुला रे काय हवं’ म्हणत प्रत्येकाची जेवणाची ऑर्डर घेतली आणि म्हणाली, ‘बरं झालं तुम्ही सारे नॉनव्हेजच आहात ते. मला झटपट जेवण बनवायला बरं ना.’ मालकिणीचं बोलणं ऐकून ही संभ्रमात पडली.
‘अहो काकू, ते नॉनव्हेज असले तरी मी व्हेज आहे ना. मग माझ्या जेवणाचं काय?’
‘एक दिवस खा की तू पण, कसले रोज रोज उपवास तुझे?’ मालकीण संतापली.
‘नाही नाही, ते शक्य नाही. असा कसा उपवास मोडू माझा? प्रत्येकाची काही तत्त्व असतात काकू.’ ती बोलली.
‘अगं मग तुझं तू करून घे एक दिवस. मला आज सात-आठ मुलांच्या जेवणाची ऑर्डर मिळाली ती कशी सोडू मी.’ काकू बोलली.
‘बरं. घेते मी माझं जेवण बनवून. पण रात्रीचं जेवण करेन मी. आता उपवासच.’ तिच्या बोलण्यावर काकूने डोक्याला हात लावला. ती जेवण करण्यात गुंतली.
हिच्या उपवासाच्या दिवशी चिकनचा वासच वास सुटला. काकू कधी काही करेल याचा नेम नाही. पण तिला कुणाचा आधार नाही. त्यामुळे जेवणाच्या ऑर्डर घेऊन ती आपला उदरनिर्वाह चालवतेय, हे लक्षात घेऊन ती काहीच बोलली नाही.
दुपारी कॉलेजचे विद्यार्थी हजर राहिले. जेवणाची स्तुती करत जेवण केले आणि निघूनही गेले. मालकीण पैसे मोजत स्वत:शीच हसली. ती मात्र सारं चित्र न्याहाळत राहिली.
काकूने हिला विचारलंच, ‘तू लवकर आलीस ऑफिसमधून... उपवास झेपत नाही, तर कशाला करतेस? जेवून घे नॉनव्हेज.’ काकूचं हे अतिचं बोलणं तिला झेपलं नाही. ती काकूकडे काहीच न बोलता पाहत राहिली. काकूनेही जेवणावर यथेच्छ ताव मारला आणि निवांत झोपी गेली. तीदेखील डोकं दुखत असल्याने जरा झोपली.
काही वेळाने कसल्याशा गलबलाटाने तिला जाग आली. तिने उठून पाहिलं, तर बाहेर कसलासा गोंधळ चाललेला. खिडकी उघडून पाहिलं, तर बाहेर बरीच गर्दी जमलेली. कुणीतरी जोरजोरात रडत असल्याच्या आवाजाने ती हादरली. तिचं लक्ष काकू झोपलेल्या जागी गेलं, तर काकू जागेवरून गायब.
‘आता ही कुठे गेली?’ तिने आजूबाजूला पाहिलं, तर काकूच नाही. बाहेर डोकावलं तरी काकू कुठे दिसेना. तिचं डोकं भणभणू लागलेलं. पाणी पिऊन ती बाहेरचं वातावरण न्याहाळू लागली. बाहेर नेमकं काय झालं याचा अंदाज घेण्यासाठी तिची पावलं आता दरवाजा बाहेर जाण्यासाठी वळली, तर दरवाजा बाहेरून लॉक. ‘असं कसं?’ तिला प्रश्न पडला. ‘म्हणजे काकू दरवाजाला लॉक लावून बाहेर गेली तर...’ तिला काही कळेनासं झालं.
भूक लागली म्हणून काही उपवासाचं करावं म्हणून ती किचनकडे वळली, तर किचनच्या दरवाजालाही लॉक. ‘हा काय प्रकार आहे?’ ती आता संभ्रमात पडली.
खिडकीतून तिने बाहेरच्या माणसांकडे चौकशी केली असता, शेजारी कुणी वयस्कर माणूस मरण पावल्याचं कळलं. त्यामुळे शेजारी वाढलेली गडबड जास्त ऐकू येऊ लागलेली. काकू बहुतेक तिथेच गेली असणार हे तिने जाणलं. पण लॉक करून का गेली?, उठवून सांगून गेली असती, तर बरं झालं असतं. किचनही लॉक बघून हिला भुकेने अस्वस्थ व्हायला झालं. बघता बघता तिन्ही सांजेची रात्र झाली. तरी काकूचा पत्ता नाही. हिला काही कळेना, इतका वेळ ही गेली कुठे? तिने तिला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण हिचा फोनही बंद. ‘अरे देवा!’ म्हणत ती आता काकूची वाट पाहत बसली.
रात्रीच्या जेवणाचा विषय स्टॉप झाला. उपवास चांगलाच भोवला हे जाणून ती पुन्हा पुन्हा काकूला ट्राय करत राहिलेली. पण काकू काही आली नाही किंवा ती कुठे गेली याचाही अंदाज तिला आला नाही.
काकूने कळवलेही नाही, याचं तिला वाईट वाटलं. ती रात्रभर काकूची वाट पाहत राहिलेली. डोळ्यांवरची झोपच उडाली. भूकही लागलेली. पण काही पर्याय नसल्याने ती काही करू शकली नाही.
सकाळी सहाच्या सुमारास तिच्या कानावर दरवाजा कुणीतरी उघडतोय असा आवाज आला. तिने कान टवकारले, तिची नजर त्या दिशेने वळली. पाहिलं तर काकू हातात पिशवी घेऊन दरवाजा उघडून आत आली.
‘अगं काकू तू? तू गेलेलीस कुठे मला अशी रूममध्ये कोंडून? मला सांगून तरी जायचं ना, शेजारी गेलेलीस का?’ तिने अस्वस्थ होऊन विचारलं.
‘शेजारी कशाला मरायला जाऊ. म्हातारा मेला तिथे. मला कुणी मेलं-गेलं की जाम भीती वाटते बाई. दुपारी झोपले तशी कानावर म्हातारा मेल्याची बातमी कानावर आदळली. चक्कर बिक्कर आली तर मला, म्हणून मग मी गडबडीत उठले, सारं घर बंद केलं आणि पिशवी घेऊन तशीच धावत माझ्या मैत्रिणीकडे राहायला गेले.’ काकू बोलत सुटली.
‘अगं पण, मी तुला घरात झोपलेली दिसले नाही का? मला एकटी ठेवून बाहेरच्या दरवाजाला, किचनच्या दरवाजाला लॉक करून गेलीस ते? माझा उपवास होता काल.’ ती बडबडली.
‘अगं पण तुझ्या उपवासापेक्षा माझा जीव का स्वस्त होता, मी मेले असते मग इथे तो कोलाहल ऐकून... मला सहन होत नाही सारं. कुणाच्या अशा रडण्याचा आवाज ऐकला की मी बेशुद्ध पडते. याचं कारणही तसं वेगळंच आहे, साऱ्या गोष्टी सांगता येत नसतात. तुलाही बाहेरच्या वातावरणाचा त्रास नको म्हणून मी तुलाही आतच ठेवून गेले. किचन लॉक केलं ते चुकून झालं माझ्या हातून, तेवढं माफ कर मला. चल मी तुझ्यासाठी काहीतरी गरमागरम करते.’ म्हणून ती काहीच झालं नाही, अशा आविर्भावात किचनकडे वळलीदेखील. हिला म्हणाली, ‘झालं तर एक दिवसाचे पैसे देऊ नको मला, माझ्यामुळे तुला त्रास झाला ना!’ काकूचं हे विचित्र बोलणं म्हणजे काय बोलावं आणि काहीच बोलू नये असंच.
ती काकूच्या या विचित्र वागण्यावर मग काहीच बोलली नाही. पण तिला या क्षणी काकूच्या या अशा स्वभावाचं आणि वागण्याचं कारण मात्र कळलं नाही. आजवर न कळलेलं यामागचं ‘कारण’ काय असेल याचा अंतर्मनी शोध घेत ती बराचवेळ निर्विकारपणे मालकिणीचा चेहरा न्याहाळत राहिली इतकंच.
priyani.patil@prahaar.co.in