कर्जत (वार्ताहर) : पनवेल-कर्जत मार्गावर नव्याने रेल्वे मार्गिका टाकण्याचे काम सुरू आहे. या मार्गावर कर्जत-वावर्ले दरम्यान मुंबई विभागातील सर्वात लांब बोगदा बाधण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या पारसिक बोगद्याच्या दुप्पट लांबीचा हा बोगदा आहे. या रेल्वे मार्गामुळे मुंबईहून पनवेलमार्गे लोकलने कर्जतला जाण्याचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्या या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेतही बचत होईल, असे मुंबई रेल कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आले.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने पनवेल – कर्जत नवीन उपनगरी मार्गाचे काम वेगाने सुरू केले आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबई लोकलच्या पायाभूत सुविधेत महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या बोगद्याच्या उभारणीस सुरुवात झाली आहे. सध्या मध्य रेल्वेवरील वापरात असलेल्या पारसिक बोगद्याच्या तुलनेत हा बोगदा दुपटीने लांब आहे. मुंबईहून पनवेलमार्गे कर्जतला जाण्याचा पर्याय या नव्या रेल्वेमार्गामुळे उपलब्ध होणार आहे. त्यापूर्वी २००५ मध्ये पनवेल – कर्जत या मार्गावर एकेरी मार्गिका टाकण्यात आली होती. त्या मर्गिकेतील वावर्ले ते हालिवली या बोगद्यात तांत्रिक अडचणींमुळे उपनगरीय लोकल चालविली जात नाही. त्यात त्यावेळी बनविण्यात आलेला मार्ग एकेरी असल्याने वाहतुकीस फायद्याचा नव्हता. त्यामुळे मुंबई रेल महामंडळाकडून पनवेल – कर्जत दरम्यान नवीन दुहेरी मार्गिका टाकण्याचे काम सुरू आहे. या नवीन मार्गामुळे कल्याणमार्गे कर्जतला जाण्याच्या तुलनेत या मार्गावरून वेळेची बचत होणार आहे. या मार्गामुळे पनवेल – कर्जत या शहरांचा वेगवान विकास होईल, असे एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुभाषचंद्र गुप्ता यांनी सांगितले.
एमआरव्हीसीच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प तीन (एमयूटीपी -३) अंतर्गत पनवेल – कर्जत लोकल आकारास येत आहे. या रेल्वे मार्गावर नढाळ, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे उभारण्यात येणार आहेत. यापैकी वावर्ले हा बोगदा २,६०० मीटर लांबीचा आहे. नढाळच्या बोगद्याची लांबी २१९ आणि किरवलीची लांबी ३०० मीटर आहे. वावर्ले बोगदा पूर्ण झाल्यावर हा मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे, असे एमआरव्हीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या बोगद्याव्यतिरिक्त या मार्गावर दोन उड्डाणपूल उभारण्यात येणार असून कर्जतजवळील उड्डाणपूल एक हजार २२५ मीटर आणि पनवेलशेजारचा पूल एक हजार ३७५ मीटर लांबीचा आहे. मार्च २०२५ पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.