मुंबई (वार्ताहर) : महिला प्रीमियर लीगचा थरार ४ मार्चपासून रंगणार असून सर्वच संघ जोरदार तयारीला लागले आहेत. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणाऱ्या मुंबई इंडियन्सने संघाची जर्सी सर्वांसमोर आणली आहे. निळ्या रंगाची ही जर्सी असून मुंबईचा संघ या खास जर्सीत मैदानात खेळताना दिसेल.
मुंबईने एक खास फोटो शेअर करून या जर्सीचे अनावरण केले आहे. मुंबईची ही जर्सी पुरुष संघाच्या जर्सीसारखीच दिसते. मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची जर्सी फिकट निळ्या रंगाची आहे. त्याच वेळी, जर्सीच्या दोन्ही बाजूंना गुलाबी रंग देखील दिसतो. ही जर्सी मुंबईच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरली आहे. या जर्सीवरून सोशल मिडियावर अनेकांनी आपल्या कमेंट केलेल्या आहेत.
महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम ४ मार्चपासून सुरू होणार आहे. पहिल्या सत्राचा सलामीचा सामना गुजरात आणि मुंबई यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्याच वेळी, या लीगचा अंतिम सामना २६ मार्च रोजी बेब्रॉन स्टेडियमवर खेळवला जाईल.