Friday, May 9, 2025

रविवार विशेषमहत्वाची बातमी

भाषादीप तेवत राहो...

भाषादीप  तेवत राहो...

  • मायभाषा: डॉ. वीणा सानेकर


फेब्रुवारी भाषा दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा होत आहे. या निमित्ताने भाषेसाठी सजगपणे काम करत राहणारे अभ्यासक, संशोधक, कार्यकर्ते यांच्या कामाविषयी बोलणे साहजिक वाटते. भाषेचे क्षेत्र तसे समाजात नेहमीच उपेक्षित राहिले आहे. मग भाषेकरिता अखंड आयुष्यभर काम करत राहणारी व्यक्तिमत्त्वे समाज स्मरणात ठेवणार आहे का?


एकूण भारताच्या दृष्टीने ज्यांनी मौलिक योगदान दिले, अशा म. गांधी, विनोबा भावे, राममनोहर लोहिया यांनी देशी भाषांचा आग्रह धरला. लोकमान्य टिळकांनी स्वराज्याबरोबर स्वभाषेचा आग्रह धरून केसरीचे रणशिंग फुंकले. ही सर्व माणसे ध्येयवादाने प्रेरित झालेली होती. आयुष्याचा प्रत्येक क्षण त्यांनी त्यांच्या विचारांनी सुंदर केला. आपल्या भाषेवरचा विश्वास कधी ढळू दिला नाही.


संस्कृती व इतिहासाचा अनेक संदर्भात अभ्यास करणे नि विविध अंगांनी त्याचे पैलू समजून घेणे ही खरे तर संपूर्ण समाजाची गरज असायला हवी. वि. का. राजवाडे यांनी आयुष्यभर संशोधनाचे व्रत जपले. मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचा शोध घेताना २२ खंडांची निर्मिती केली. ज्ञानेश्वरीची अत्यंत जुनी प्रत सापडल्यावर मोठा खजिना सापडल्यासारखा आनंद त्यांना झाला.


वैखरी : भाषा आणि भाषा व्यवहार, रुजुवात, मराठी भाषेचा आर्थिक संसार ही त्यांची पुस्तके आवर्जून आठवतात. भाषा आणि जीवन या त्रैमासिकाला त्यांनी आकार दिला. राज्य मराठी विकास संस्थेची रूपरेषा आखण्यात त्यांचा मोठा वाटा होता.


समाज व संस्कृतीविषयक अभ्यासाचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा दुर्गाबाई भागवतांचे नाव आठवते. त्यांनी त्यांच्या लेखनातून एका अर्थी संस्कृतीचे संचित साकारले. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा भाषाविचार देखील महत्त्वाचा ठरतो. कोणत्याही सत्तेला दडपशाही करून लोकभाषा बदलता येणार नाही. प्रजेची भाषा हीच राजभाषा असली पाहिजे, हे त्यांनी प्रखरपणे मांडले.


भा. ल. भोळे हे नाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचे नाव आहे. भाषावार प्रांतरचनेची सामाजिक फलश्रुती-या लेखात ते म्हणतात, मराठी भाषा आणि साहित्याच्या अध्यापनाची अवस्था शालेय पातळीपासून विद्यापीठ पातळीपर्यंत असमाधानकारक आहे. २००८ साली त्यांनी मांडलेले विचार आजही तितकेच खरे आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रातच आपल्या मराठीला सर्वाधिक सहन करावे लागते आहे. हे कुसुमाग्रजांचेही निरीक्षण होते. न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या प्रयत्नामुळे मुंबई विद्यापीठात देशी भाषांचा प्रवेश झाला.


कुसुमाग्रजांनी समाज संस्कृतीचा दिवा प्रज्वलित ठेवण्यासाठी भाषा जिवंत ठेवणे गरजेचे आहे, ही जाणीव करून दिली. स्वभाषारक्षणाचा प्रश्न हा केवळ मंत्रालयाचा प्रश्न नाही, तर तो सर्व समाजाचाच प्रश्न होता, असे त्यांनी म्हटले आहे.


खरे तर समाज मराठीची प्रतिष्ठापना सर्व क्षेत्रांत करत नाही, तोवर कुसुमाग्रजांनी म्हटल्यानुसार तिला मंत्रालयाच्या दारात फाटक्या वस्त्रानिशी उभे राहावे लागणार. समाजाने आपल्या भाषेशी प्रामाणिक राहिले पाहिजे, हे जितके खरे तितकाच शासकीय पातळीवर मराठीचा विचार किती ठामपणाने होतो हेही तितकेच खरे!


महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी विलक्षण दूरदृष्टीतून भाषाविषयक यंत्रणा उभ्या केल्या. आपल्या स्वार्थाकरिता राजकीय नेत्यांनी त्यांचा वापर करू नये, ही जाणीव त्यांनी निर्माण केली. समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये जेव्हा आपल्या भाषेचा प्रयोग केला जातो तेव्हा ती जगते. हे त्यांनी प्रखरपणे मांडले. यशवंतराव चव्हाण हे कर्ते नेते होते. आजच्या नेत्यांनी त्यांचे भाषाप्रेम शिकावे नि आचरणात आणावे, असे वाटते. अन्यथा भाषा दिन दरवर्षी साजरा होईल. पण ती दीन होण्याचा धोका मात्र वाढतच जाईल.

Comments
Add Comment