Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

अजित पवार तोंडघशी पडले, थोरात म्हणाले मी राजीनामा...

अजित पवार तोंडघशी पडले, थोरात म्हणाले मी राजीनामा...

अहमदनगर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्ष गटनेतेपदाचा राजीनामा नाट्याच्या बातम्या येत असताना. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही थोरात यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले होते. मात्र, थोरात यांनी आज पत्रकारांशी बोलताना मी राजीनामा दिल्याचे कोणी सांगितले? असा प्रतिप्रश्न प्रसारमाध्यमांना केला आहे. यामुळे थोरात यांच्या राजीनाम्याची प्रसार माध्यमांना माहिती देणाऱ्या अजित पवार चांगलेच अडचणीत आले आहेत.


काँग्रेसच्या जयपूर येथील राष्ट्रीय अधिवेशनासाठी थोरात गेले आहेत. थोरात पुढे म्हणाले, पक्षस्तरावर या संदर्भात चर्चा सुरू आहे. सर्वच पक्षांत हे असेच चालते. मात्र, काँग्रेससंबंधी याची जास्त चर्चा होते,अशी पुस्तीही थोरात यांनी जोडली. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये संघर्ष झाला होता. थोरात यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले थोरात आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात मतभेद झाली. यावरून थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आणि आपला विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामाही पाठविल्याच्या बातम्या येऊ लागल्या.


याचदरम्यान थोरात यांचा वाढदिवस होता. त्यादिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विरोधीपक्ष नेते पवार यांनी थोरात यांना फोन केला होता. त्यावेळी जे संभाषण झाले, ते पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यातही थोरात यांच्या राजीनाम्याचा उल्लेख होता. तेव्हा अजित पवार म्हणाले होते की, थोरात यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. त्यावेळी थोरात यांनीच आपण पदाचा राजीनामा पाठवून दिल्याचे सांगितले.


मात्र, स्वत: बाळासाहेब थोरात यांनी यासंबंधी प्रसार माध्यमांकडे कोणताही खुलासा केला नव्हता. त्यानंतर महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यासमवेत बैठक झाली. पुढे थोरात व पटोले यांच्यातील मतभेद दूर झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रायपूर अधिवेशनालाही थोरात यांना निमंत्रण आले. तेही तेथे सक्रिय सहभागी झाले आहेत. आता मात्र त्यांनी आपण राजीनामा दिलाच नसल्याची भूमिका घेतली आहे.

Comments
Add Comment