- ओंजळ: पल्लवी अष्टेकर
‘परीक्षा’ म्हटले की, लौकिक अर्थाने आपल्या डोळ्यांसमोर शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालक अशी टीमच येते. परीक्षा जवळ येईल तशी ही टीम अस्वस्थ होऊ लागते. वर्षभर घोकलेले विज्ञानातील नियम, गणितातील सूत्रे, भाषेतील निबंध असे सर्व काही डोळ्यांसमोर तरळू लागते. निव्वळ परीक्षेतील गुणांवर यश-अपयश तोलणारे असंख्य पालक आपण आपल्या सभोवताली पाहत असतो. कधी-कधी आपणही त्यातले एक असतो; परंतु आज मला केवळ शैक्षणिक परीक्षांबद्दल बोलायचे नाही, तर आयुष्यभर आपण ज्या विविध परीक्षा देत असतो, त्याबद्दल सांगायचे आहे. त्यात परीक्षेतील गुणांच्या बरोबरीने माणसातील गुणांच्या परीक्षेचाही अंतर्भाव आहे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी काही काळ तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांना पक्षपातीपणा केलेला आवडत नसे. वशिलेबाजी चालत नसे. विद्यार्थ्यांवर त्यांनी कधी अन्याय होऊ दिला नाही. अहंकारापासून ते दूर होते. ते म्हणायचे, ‘जेव्हा आपणास समजते की, आपल्यात अहंकार निर्माण झाला आहे, त्याच क्षणी आपले ज्ञान व शिक्षण संपते. ५ सप्टेंबर रोजी भारतात साजरा होणारा ‘शिक्षक-दिन म्हणजे शिक्षकांबद्दलच्या सामाजिक ऋणांची जाणीव. शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते कोमलता, मृदुता व शिस्तबद्धता, प्रेमळपणा अशा मोत्यांनी गुंफले गेले, तर परीक्षा या विषयाचा फार बाऊ न होता विद्यार्थ्यांतील खऱ्या गुणांना महत्त्व प्राप्त होईल व ते त्यांच्या पुढील आयुष्यात हितकारक ठरू शकतील.
एका आलिशान घरामध्ये एक आई-बाबा व मुलगा असे त्रिकोणी कुटुंब राहायचे. लहानपणापासून मुलाच्या मनावर सतत अभ्यास बिंबवला गेला. मुलाची आई बालरोगतज्ज्ञ व वडील अभियंता. आपापल्या करिअरच्या अतिव्यस्त रूटिनमुळे मुलाला आई-बाबा फार कमी मिळायचे. त्याची निसर्गाची ओढ वाढू लागली. शाळेतल्या सहलीसोबत तो गड, किल्ले, ऐतिहासिक क्षेत्र पाहायला जायचा. तेथील गाइडचे काम करणारे लोक त्याला आवडायचे. तो मोठा होत गेला, तसे टुरिझम हे क्षेत्र त्याला खुणावू लागले; परंतु त्याच्या आई-वडिलांना हे पसंत नव्हते. ‘अरे, तुझे बाबा अभियंता. मग तूही त्यांच्यासारखाच अभियंता’ हो.’ आई म्हणायची. वडील म्हणायचे, ‘पोरा, का आमची अशी परीक्षा घेतोस? तुझ्या आईचे क्लिनिक तुझ्यासाठी तयार आहे. तू बालरोगतज्ज्ञ हो.’ परंतु मुलाने आपल्या मनाचा कौल ग्राह्य मानला. त्याने टुरिझमचा अभ्यासक्रम पूर्ण केला व आता तो एका प्रसिद्ध टुरिझम कंपनीत टूर मॅनेजर म्हणून कामाला आहे. त्याचे कॉलेजातल्या मुलांना सांगणे आहे की, तुमच्या आवडी-निवडीला प्राधान्य देऊन करिअर निवडा. मी आता माझे जगणे मुक्तपणे उपभोगतोय व माझ्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत आहे. सुरुवातीला नाराज असलेले माझे पालक मी यशस्वी होतोय, हे पाहून सुखावत आहेत.
अनेक मानसोपचारतज्ज्ञ, सायकॉलॉजिस्ट यांनी ‘परीक्षा व त्यातील ताणतणाव’ त्यावर कशी मात करावी, ‘पास-नापास हा जीवन-मरणाचा प्रश्न नव्हे’ अशा आशयाची पुस्तके लिहिली आहेत. ती पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आहेत. मुलांतील कलागुणांचा विकास व्हायचा असेल, तर त्यांना निव्वळ अभ्यासाला जुंपून फायदा नाही. मुलांवर पालकांनी सातत्याने दबावतंत्राचा वापर केला, तर मुलांमधील आत्मविश्वास कमी होतो. निव्वळ परीक्षेतील यशरूपी चष्म्याने मुलांकडे पाहू नका.
श्यामू व गोपू हे दोघे लहानपणापासून एकमेकांचे मित्र होते. श्यामू श्रीमंत, तर गोपू गरीब! श्यामूची वाडवडिलोपार्जित शेती तो पुढे चालवित होता. गोपू मिळतील ती कामे करून घर चालवायचा. एकदा गोपूची बायको खूप आजारी पडली. तिच्या दवाखान्यासाठी भरपूर पैसे खर्च होऊ लागले. आपल्या मिळकतीत भागेना म्हणून गोपूने आपल्या दोस्ताकडे, श्यामूकडे मदत मागायची ठरविली. तो एके दिवशी श्यामूच्या घरी आला व आपली सारी परिस्थिती त्याला कथन केली.
‘मला पैशांची मदत हवी आहे,’ गोपू श्यामूला म्हणाला, ‘मी तुझ्या पैशांची परतफेड करीन.’ ‘मित्रा, संकटाच्या प्रसंगात, तर दोस्ती कामास येते. निःसंकोचपणे हे पैसे स्वीकार. पुन्हा कधी अडीअडचणीच्या वेळी माझ्याकडे ये.’ मित्राच्या मदतीचे उपकार घेऊन गोपू घरी परतला. यथावकाश औषधोपचारांनी गोपूची बायको बरी झाली. आपले साठवलेले पैसे घेऊन तो श्यामूचे पैसे परत करायला गेला. श्यामूचे डोळे पाणावले. ‘दोस्ता, माझ्या मैत्रीची परीक्षा घेतोस होय? अरे, कधीही अडी-अडचणीला ये. हा दोस्त तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. असे म्हणून दोघा मित्रांनी एकमेकांना मिठी मारली. ही झाली मैत्रीची परीक्षा.
जपानसारख्या देशांची भौगोलिक रचना अशी की, तिथे वारंवार भूकंप होतात. मोठ्या भुकंपाने तिथे त्सुनामी येऊन गेली होती. माणुसकीची परीक्षा घेणारा हा प्रसंग. त्सुनामीमुळे घरे-दारे उद्ध्वस्त झालेले लोक इकडून-तिकडे फिरत होते. अशा वेळी हे लोक सहनशक्तीची परिसीमा गाठतात. सहसा इथे मारामारी होत नाही. जपानमधला हा प्रसंग माझ्या मनावर ठसून गेला आहे. जपानच्या एका गावातील एका बाईच्या पडक्या घरात काही अन्न शिल्लक होते. तिने व तिच्या नवऱ्याने ठरविले की, इथून भुकेल्या जाणाऱ्या वाटसरूंना आपण पोटाला वाढल्याशिवाय जाऊ द्यायचे नाही. बाईच्या पदरी सहा-सात महिन्यांचे पोर होते. तिने आपल्या पाठीला मूल बांधले. घराबाहेर खाण्याचे सामान, कढई हे सर्व नेले. आजूबाजूच्या पडलेल्या लाकडांनी त्यांनी शेकोटी पेटवली. तिचा नवरा तिला या कामात मदत करत होता. गरमागरम नूडल्स, सहजपणे जमणारे जपानी पदार्थ तो भुकेलेल्यांना खाऊ घालत होता. जाणारे समाधानाने दोघांना आशीर्वाद देऊन जात होते. ही माणुसकीची परीक्षा. मनुष्य अशा परीक्षा आयुष्यभर देत असतो. शालेय वयापासून सुरू झालेल्या या परीक्षा जीवनभर सुरू असतात. परिस्थितीशी दोन हात करण्यातली जिद्द, सहनशक्ती इथे कामास येते.