पुणे : कसबा-चिंचवडमधील मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक तरुणी थेट लंडनहून पुण्यात आली. मतदानाचा हक्क का सोडू? असे म्हणतच या तरुणीने मतदान करत एक अनोखा संदेश मतदारांना दिला आहे.
पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु असताना चर्चा रंगली ती म्हणजे मतदानासाठी थेट लंडनहून परतलेल्या तरुणीची. अमृता देवकर असे या तरुणीचे नाव असून कसबा पोटनिवडणुकीतील आपल्या मतदानासाठी ती थेट लंडनहून पुण्यात आली आहे.
रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रशालेत येऊन आपला मतदानाचा हक्क अमृताने बजावला. यावेळी तिचे कुटुंबीय तिच्यासोबत होते. यावेळी बोलताना अमृता म्हणाली, माझे लहानपण पुण्यात गेले, आता मी लंडन येथील मँचेस्टर येथे राहते. आज मतदानासाठी पुण्यात आले आहे. मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे ते सर्वांनी बजावले पाहिजे, असा संदेश अमृताने दिला आहे.