नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला प्रिमीयर लीगचे यंदा प्रथमच आयोजन केले आहे. ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेकरिता संघ आपले कर्णधार आणि उपकर्णधारांची नावे जाहीर करत आहेत. भारताची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माकडे युपी वॉरियर्स संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाची अनुभवी सलामीवीर यष्टीरक्षक एलिसा हिलीकडे युपी वॉरियर्सच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यानंतर रविवारी संघाने आपल्या उपकर्णधाराची नियुक्ती केली. युपी संघाने बऱ्याच खेळाडूंवर पैसे खर्च केले. त्यांनी तब्बल २ कोटी ६० लाख अशी मोठी रक्कम खर्चून दीप्ती शर्माला संघात घेतले आहे. लिलावात यूपीच्या संघाने बऱ्याच दमदार खेळाडूंवर बोली लावत आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे.