
- क्राइम: अॅड. रिया करंजकर
भरत याला आर्थिक अडचण निर्माण झाल्याने काही रकमेची त्याला गरज होती. म्हणून त्याने आपल्या मित्राकडे विचारणा केली. दीड-दोन लाखांचा प्रश्न होता. मित्र बोलला, ‘माझ्याकडे एवढी रक्कम नाहीये.’ मित्राने भरतला सुचवले की, आमच्या इथे प्रायव्हेट फायनान्सर कंपनी आहे. तिथून गरजू लोकांना आर्थिक मदत होते. फक्त काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. भरतला वाटलं, इतर कोणाकडे मागत बसण्यापेक्षा फायनान्सर कंपनीकडून घेतले तर चांगलेच होईल म्हणून कागदांची जुळवाजुळव करून तो आपल्या मित्रासोबत फायनान्सर कंपनीकडे गेला. फायनान्स कंपनीची अधिकारी एक महिला होती. भरतला त्यांनी सगळं व्यवस्थित समजावून सांगत कंपनीची जी जागा आहे, ती त्यांची स्वतःचीच आहे, असे सांगितले. भरतला त्यांनी अगोदर दहा हजार रुपये भरायला सांगितले. दहा हजार रुपये भरले व पाच दिवसांच्या आत त्याला दीड लाख रुपये लोन मिळाले. त्याचा हप्ताही ठरला गेला. भरतनेही ही गोष्ट आपल्या बहिणीला सांगितली आणि त्यांच्या परिसरात ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. तिथेच राहणाऱ्या लोकांनाही पैशांची गरज होती. म्हणून भरत आणि भरतच्या बहिणीसोबत ते फायनान्स अधिकारी महिलेला भेटायला गेले.
त्या महिलेने त्यांना समजावून सांगितले, ‘ही कंपनी आता नवीन सुरू झालेली आहे. पण, स्वतःच्या मालकीची जागा ऑफिसची आहे व मी इथे याच बिल्डिंगमध्ये राहत आहे. असे तिने त्या लोकांना सांगून स्वतःचे घरही दाखवले. भरतला दीड लाख रुपये मिळाले होते म्हणून बाकीच्या लोकांचा तिच्यावर विश्वास बसला आणि प्रत्येकी वीस जणांनी तिच्याकडे दहा हजारांची तिच्याकडे गुंतवणूक केली. त्याच्या बदल्यात ती त्यांना लोन देणार होती. तिने त्याप्रमाणे अॅग्रीमेंट बनवून घेतलेलं होतं, पण ते अॅग्रीमेंट मात्र स्वतःकडे तिने ठेवलेलं होतं. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर दोन-चार दिवसांत तुम्हाला लोन मिळेल, असं सर्व लोकांना सांगितलं.
लोकांनाही बरं वाटलं की, आपल्याला लोन मिळेल आणि दोन-तीन दिवसांनंतर तिथे वाट बघू लागले. पण दोन-तीन दिवसांनंतर त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे आले नाहीत म्हणून तिच्याशी संपर्क केला असता थोडा वेळ लागत आहे, कारण एकदम २० जणांची रक्कम आहे. असं ती सांगू लागली. पुन्हा फोन केल्यावर तेच उत्तर लोकांना मिळू लागलं. एक महिना होऊन गेला तरी लोकांना लोन मिळेना म्हणून लोक तिच्याशी संपर्क करू लागले, तर तिचा फोन स्वीच ऑफ येऊ लागला. भरत त्याची बहीण व सर्व लोक तिच्या ऑफिसमध्ये भेटायला गेले असता ते ऑफिस बंद असल्याचे त्यांना समजले. ते सर्वजण त्याच बिल्डिंगमध्ये राहत असलेल्या तिच्या घरी गेले असता लोकांना त्यावेळी समजलं की, ते घर तिने भाड्याने घेतलेलं होतं, घरच नाही तर जे ऑफिस सुरू केले होते, तीही जागा तिने भाड्यानेच घेतलेली होती.
लोकांनी आजूबाजूला चौकशी केली असता तेथील स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, तुमच्यासारखी अनेक लोकं दररोज येथे येत असतात आणि तिचा शोध घेत आहेत. म्हणून भरत आणि त्याच्यासोबत आलेल्या लोकांनी पोलीस स्टेशन गाठले असता पोलिसांनी त्यांना सांगितलं की, तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी पोलीस तक्रार करा. त्याप्रमाणे या सर्व लोकांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवलेली आहे. भरतसारख्या लोकांना लोन दिले आहे. त्याच्या व्याजासाठी ही महिला भरतला फोन करत नाही. दोन-तीन लोकांना लोन देऊन त्यांच्या नातेवाइकांमध्ये लोनची लालसा निर्माण करून फायनान्स करणाऱ्या महिलेने अशा कितीतरी लोकांना फसवलेलं आहे. आता ही महिला सध्या फरार आहे.
पटकन आपल्याला लोन मिळते म्हणून लोक कोणत्याही गोष्टीची खातरजमा न करता स्वतःची पदरमोड करून फ्रॉड कंपन्यांमध्ये पैसे लावतात आणि स्वतः त्याच्यामध्ये फसलेही जातात.
(सत्य घटनेवर आधारित)