जम्मू- काश्मीर (वृत्तसंस्था)- दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात एका काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. संजय शर्मा (४० वर्षे) असे त्यांचे नाव असून त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
संजय हे अचन येथील रहिवासी असून तो बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होते. सकाळी १०.३० वाजता संजय पत्नीसोबत बाजारात जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.
काश्मीर खोऱ्यात या वर्षातील ही पहिलीच टार्गेट किलिंग आहे. यावेळी मृत संजय यांच्या घरी शेजारी लोक जमा झाले. एका मुस्लिम शेजाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी संजय शर्मा यांची हत्या करून अतिशय चुकीचे काम केले.
शोकाकुल वातावरणाचा फायदा घेऊन दहशतवादी अशा प्रकारची कोणतीही घटना घडवू नये, यासाठी मृतांच्या घराबाहेर सुरक्षा दलही तैनात असते.
२०२२ मध्ये काश्मिरी पंडित टार्गेटवर
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, २०२२ मध्ये काश्मिरी पंडित आणि स्थलांतरित मजुरांवर दहशतवाद्यांनी २९ टार्गेट अटॅक केले. मृतांमध्ये तीन जिल्हास्तरीय नेते (पंच आणि सरपंच), तीन काश्मिरी पंडित, एक स्थानिक गायक, राजस्थानमधील एक बँक व्यवस्थापक, एक शिक्षक आणि जम्मूमधील एक सेल्समन आणि ८ स्थलांतरित मजुरांचा समावेश आहे. या हल्ल्यात सुमारे १० प्रवासी मजूर जखमी झाले.