- ऐकलंत का!: दीपक परब
मराठीतील नामवंत, प्रयोगशील आणि यशस्वी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी नेहमीच रसिकांना आगळ्यावेगळ्या विषयांवरील चित्रपट बनवून भुरळ पाडली आहे. कुस्तीमध्ये देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणारे आणि मराठी माणसाचा मानबिंदू असणारे जागतिक दर्जाचे पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनविण्याचा निर्णय नागराज मंजुळे यांनी घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाडमध्ये महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजित भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात नागराज मंजुळे यांनी हजेरी लावली होती. याच कुस्तीच्या मैदानातून नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवण्याची घोषणा केली. कोल्हापुरातील कुस्तीच्या मैदानातून नागराज यांनी ही घोषणा केल्यानंतर आता या सिनेमाची चाहत्यांना आणि कुस्तीप्रेमींना उत्सुकता आहे.
आमिर खानचा ‘दंगल’ हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या माध्यमातून गीता आणि बबिता फोगाट भगिनींच्या कुस्तीचा सुवर्णप्रवास दाखविण्यात आला होता. आता गावच्या लाल मातीत खेळलेला आणि देशासाठी पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळवणारा लाल मातीतला मराठी माणूस म्हणजेच, खाशाबा जाधव यांचे आयुष्य रूपेरी पडद्याच्या माध्यमातून जगासमोर यावे यासाठी नागराज हा सिनेमा बनवणार आहेत.
‘खाशाबा जाधव हे जागतिक किर्तीचे आणि दर्जाचे पैलवान होते. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती व त्यातूनच त्यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी ही खूप मोठी व आनंदाची गोष्ट आहे. लवकरच मी यासंदर्भात अधिकृत माहिती देईन. या सिनेमाचे शूटिंगदेखील कोल्हापुरात होऊ शकते व त्या माध्यमातून प्रेक्षकांना तो जुना, भारावलेला काळ अनुभवायला मिळणार आहे’, असे नागराज मंजुळे यांनी सांगितले.
देशाला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देण्यात खाशाबा जाधव यांचा मोलाचा वाटा आहे. खाशाबा हे एकमेव भारतीय ऑलिम्पिक पदक विजेते आहेत, ज्यांना पद्म पुरस्कार मिळालेला नाही. भारत सरकारने खाशाबा यांना कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले.