मुंबई (वार्ताहर) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा कबड्डी असो.च्या यजमान पदाखाली ‘२१व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक’ पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ मार्चपासून जळगाव येथील सागर पार्क येथे होणाऱ्या या स्पर्धेत यंदा ७५ लाखांचे अंदाज पत्रक मंजूर करण्यात आले आहे. साखळीतील पहिल्या सामन्यापासून अंतिम फेरीपर्यंतच्या विजयी व पराभूत होणाऱ्या सर्व संघांना रोख रकमेच्या पारितोषिकांची खैरात होणाऱ्या या स्पर्धेत खेळाडूंना मिळणाऱ्या वैयक्तिक पारितोषिकांचा कोठेच उल्लेख नाही.
जळगाव येथे होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील पहिले १२ पुरुष व महिला संघ तसेच विदर्भ कबड्डी असो. पहिले ४ पुरुष व महिला असे १६-१६ जिल्ह्यांचे संघ सहभागी होणार आहेत. संघ निश्चित झाल्यावर लवकर त्यांची गट विभागणी जाहीर केली जाईल. आतापर्यंत शासनाच्या माध्यमातून विविध जिल्ह्यात २० स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील ६ स्पर्धा विदर्भ कबड्डी असो.च्या अधिपत्याखाली झाल्या. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. ने १४ स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले असून यंदाची ही १५वी कबड्डी स्पर्धा आहे. या स्पर्धेकरिता जळगाव जिल्हा कबड्डी असो.ने कंबर कसली असून सागर पार्क येथील मैदानावर याची जोरदार तयारी सुरू झाली आहे.