
पुणे: चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ३.५२ टक्के मतदान झाले आहे. तर नंतर ११ वाजेपर्यंत १०.४५ टक्के एवढे मतदान झाले. यात ३६ हजार ८६६ पुरुष तर २२ हजार ५७९ महिला अशा ५९ हजार ४३७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण पाच लाख ६८ हजार ९६४ मतदार आहेत. त्यात तीन लाख दोन हजार ९६४ पुरुष तर दोन लाख ६५ हजार ९७४ महिला आणि तृतीयपंथी ३४ मतदार आहेत. दिव्यांग १२ हजार ३१३, ८० वर्षांवरील मतदारांची संख्या ९ हजार ९२६ आहे. तसेच अनिवासी भारतीय ३३७, सैनिक मतदार १६८ या निवडणूक प्रकियेत सहभागी होणार आहेत.
मतदानाच्या वेळी धक्काबुक्की
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाच्या वेळी भाजप उमेदवार अश्विनी जगताप व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे समर्थक आपसात भिडले. चिंचवडमध्ये जगताप समर्थक गणेश जगताप आणि कलाटे समर्थक माजी नगरसेवक सागर आंघोळकर यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी भांडणात एकमेकांना मारण्यासाठी दगड उचलल्याचे पाहायला मिळाले.