Sunday, October 26, 2025
Happy Diwali

जे आपल्या बापाचा आदर करु शकत नाहीत त्यांना लाज वाटली पाहिजे!

जे आपल्या बापाचा आदर करु शकत नाहीत त्यांना लाज वाटली पाहिजे!

लखनऊ (वृत्तसंस्था): विधानसभेतील अभिभाषणा दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांच्यात आज जोरदार वादावादी झाली. यावेळी योगी यांनी प्रयागराज गोळीबार प्रकरणाबाबत बोलताना मुलायम सिंह यांच्या 'मुले चुका करतात' या विधानाचा उल्लेख केला. तर अखिलेश यांनी चिन्मयानंद यांच्याबद्दल प्रश्न विचारला. यामुळे संतप्त झालेले योगी म्हणाले की, जे आपल्या बापाचा आदर करू शकत नाहीत त्यांना राज्यातील सुरक्षेबाबत बोलताना लाज वाटली पाहिजे.

योगी आदित्यनाथ यांनी भाषणादरम्यान सपावर आरोप करताना म्हटले, हे लोक गुन्हेगारीशिवाय काहीही करू शकत नाहीत. हे लोक गुन्हेगारांना संरक्षण देतात. पण या माफियांना समूळ नष्ट करण्याचं काम आम्ही करू. प्रयागराज येथील घटनेचा सूत्रधार यूपी बाहेरील आहे. त्यांना तिकीट देऊन आमदार, खासदार केलं गेलं.

योगी यांनी पुढे बोलताना अखिलेश यादव यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. यावेळी अखिलेश यांना वडिल मुलायम सिंह यादव यांच्या विधानाची आठवण करुन देत योगी म्हणाले, 'मुलं मुलंच असतात, त्यांच्याकडून चुका होतात', अशीच विधाने करणारे लोकशाहीबद्दल बोलतात, याचेच आश्चर्य वाटते. यावर बलात्कार प्रकरणात आरोपी असलेल्या चिन्मयानंदचा उल्लेख करत अखिलेश यादव म्हणाले की, "हेही सांगा की चिन्मयानंदचे गुरू कोण आहेत? तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे". हे ऐकून सीएम योगी संतापले आणि अखिलेश यांना म्हणाले, "ज्याला स्वतःच्या बापाचा आदर करता येत नाही. त्याला लाज वाटली पाहिजे".

यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांच्या एकत्र येण्यावरही टोमणा मारला. काका शिवपाल यांनी स्वाभिमान जपायला हवा असा खोचक सल्ला त्यांनी शिवपाल यादव यांना दिला.

Comments
Add Comment