कल्याण : कल्याण पूर्वेत एका ६३ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री मृत्यू झाला आहे. दीपक भिंगारदिवे (६३) असे मृत व्यक्तीचे नाव असून पोलिसांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र फिट येऊन त्यांनी आपले प्राण सोडल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व कोळशेवाडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री ऑल आऊट ऑपरेशन सुरू होते. त्याअंतर्गत प्रशिक दीपक भिंगारदिवे (२४) या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले होते. आपल्या मुलाला का आणले याबाबत विचारणा करण्यासाठी प्रशिकचे वडील दीपक भिंगारदिवे हे पोलीस ठाण्यात आले होते. दीपक भिंगारदिवे यांची पत्नी नंदा या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आहेत. दरम्यान पोलीस विचारपूस करत असताना दीपक मोबाईलमधून शूटिंग करत होते. त्यावेळी त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. काही वेळाने दिपक भिंगारदिवे यांना फिट आली. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या प्रकरणी भिंगारदिवे कुटुंबियांनी मात्र दीपक यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओ काढताना पोलिसांनी मारहाण केल्याने दीपक यांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला पोलीसच जबाबदार असून आम्हाला न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे दीपक यांच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले.
दरम्यान याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पोलिसांनी विनाकारण मारहाण केल्याचा आरोप करत न्याय देण्याची मागणी केली आहे.
A Rashtravadi Congress office bearer Deepak Bhingardive after being beaten in police chowky for no crime died in the chowky.
FIR should b registered all those who were present and those who brought him
Plz Dnt try to hush up the matter @ThaneCityPolice @Dev_Fadnavis pic.twitter.com/FHCfeCGVFr— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 24, 2023
याबाबत पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ शूटिंग पोलीस स्टेशनला असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले असून सदरचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सीआयडीकडे तपासाकरिता देण्यात येईल. तसेच दीपक यांचा इनक्वेस्ट पंचनामा आणि पोस्टमार्टम यासंदर्भात ज्युडीशियल मॅजिस्ट्रेट, ठाणे यांनी आदेश दिलेले आहेत. याचे व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा सीआयडीकडून होणार असून ज्युडीशियल मॅजिस्ट्रेटकडून स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे.