Friday, May 9, 2025

रिलॅक्समहत्वाची बातमी

‘माझी जन्मठेप’ गौरवांकित झेप

‘माझी जन्मठेप’ गौरवांकित झेप

  • कर्टन प्लीज : नंदकुमार पाटील


दिग्दर्शक म्हणून डॉ. अनिल बांदिवडेकर आणि निर्माता म्हणून अनंत पणशीकर यांचे प्रज्ञावंतांच्या यादीत नाव आहे. व्यावसायिक पातळीवर काम करीत असताना सकारात्मक, प्रयोगशील कार्यक्रम करताना प्रेक्षक चिंतनशील होतील, कौतुक करतील, असे छान काहीतरी झपाटून करत राहण्याचा या दोघांनी ध्यास घेतलेला आहे. नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या नावाने महाराष्ट्र पातळीवर एकांकिका स्पर्धा आयोजित केली होती. आयोजक आणि समीक्षक या नात्याने हे दोघे एकत्र आले होते. पुढे या दोघांनाही प्रबोधनात्मक काही करण्याची गरज वाटली आणि त्यातून ‘प्रणाम भारत’ची कल्पना पुढे आली. भारावून जाणे या दोघांना माहीत नाही. आवाका लक्षात घ्यायचा आणि सतत्य ठेवण्यासाठी पाठपुरावा करायचा हे या दोघांच्या कार्याचा एक भाग आहे. हेतू, मने जुळले की, धनापेक्षा तनाची व्याप्ती वाढते. मग आणखी काहीतरी छान करण्याची इच्छा निर्माण होते. प्रणाम भारताच्या माध्यमातून क्रांतिवीरांचे समग्र दर्शन अभिवाचनातून घडवणे या दोघांनी ठरवले, तसे घडले आहे. उमाजी नाईक, राजगुरू, मदनलाल धिंग्रा हे सध्या प्रणव भारताचे मानबिंदू आहेत. पहिल्या भागात अभिवाचन, दुसऱ्या भागात वाचन आणि प्रत्यक्ष अभिनय आणि तिसऱ्या भागात प्रेक्षक प्रभावीत होतील असा क्रांतिवीरांचा जागर सारं काही प्रेक्षकांसाठी, सादरकर्त्या कलाकारांसाठी अद्भुत अनुभूती आहे. यातून एक गोष्ट लक्षात आली. आवस्तव खर्चाचा मोह आवरायला हवा. सामाजिक जाणिवेने एखादी गोष्ट केली, तर ते प्रेक्षकांना हवे असते. त्यामुळे या धगधगत्या अग्निकुंडाने प्रायोगिक आणि व्यावसायिक यांच्यामधला सुवर्णमध्ये काढला आहे. अभिवाचन आणि सोबतीला प्रकाश योजना, नेपथ्य, संगीत सारं काही परिणाम करणारे असायला हवे. ही संकल्पना पुढे आली आणि यातून क्रांतिकारक, हिंदुत्वाचे प्रणेते, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव पुढे आले.



‘माझी जन्मठेप’ हा सावरकरांचा चारशे ऐंशी पानाचा महाग्रंथ जगभर प्रसिद्ध आहे. ज्यांनी वाचला ते सावरकरमय झाले आहेत. वेळेच्या आणि कामाच्या चक्रात गुंतलेले, अल्प वेळेत माझी जन्मठेप जाणून घेणाऱ्यांची संख्या ही प्रचंड आहे. त्यांच्यासाठी ही निर्मिती आहे. ४०-५० पानांत समग्र जन्मठेप बसवायचे म्हणजे तसे ते जिकरीचे, जिद्दीचे काम आहे. अलका गोडबोले या सावरकरांच्या अभ्यासिका. त्यांनी ही किमया केलेली आहे. दिग्दर्शक बांदिवडेकर आणि निर्माते पणशीकर यांना अपेक्षित संहिता त्यांनी लिहून दिली आहे. आज शिवाजी पार्क इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात संध्याकाळी सहा वाजता विनामूल्य प्रयोग होणार आहे. त्याला कारण म्हणजे सावरकर स्मारकाच्या सहकार्याने ही निर्मिती केली आहे. प्रेक्षकांसाठी, कार्यकर्त्यांसाठी सावरकर ज्यांच्यासाठी प्रेरणा, श्रद्धास्थान आहेत, अशा प्रेक्षकांसाठी हा प्रयोग करण्यात येणार आहे. नाट्यसंपदा कला मंचाने या नाटकाची निर्मिती केलेली आहे.


या कलाकृतीची संकल्पना अनंत पणशीकर यांची आहे. शिवाय त्यांनी नाटकाची निर्मितीसुद्धा केलेली आहे. अलीकडे भरपूर प्रसिद्धी मिळावी म्हणून अज्ञानी, सवंग, गैरसमजुतीचे विधान करणे वाढलेले आहे. गेल्या तीन-चार महिन्यांत झालेल्या वादग्रस्त विधानांचा मागवा घेतल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव पुढे येते. त्यामुळे पहिली निर्मिती ही त्यांच्यापासून सुरू केलेली आहे. ज्यांना सावरकर जाणून घ्यायचे आहे, सावरकरांविषयी गैरसमज आहेत, धर्मांतर, हिंदी भाषा, हिंदुत्व यासाठी सावरकरांनी केलेले कार्य आजही चेतना निर्माण करणारे आहे. तो अनुभव प्रेक्षकांना घेता यावा, आजच्या युवा पिढीला सावरकर ज्ञात व्हावेत, ही त्यापाठीमागची संकल्पना आहे.


‘माझी जन्मठेप’ची निर्मिती प्रभावी, प्रेरणादायी व्हावी या दृष्टीने व्यवसायिक जुळवाजुळव केली असली तरी त्याची झळ सावरकरप्रेमींना, प्रेक्षकांना बसणार नाही, याची काळजी पणशीकरांनी घेतली आहे. अत्यंत अल्प दरात ‘माझी जन्मठेप’ पाहण्याची तरतूद पुढे केली जाणार आहे. डॉ. अनिल बांदिवडेकर हे स्पर्धेतून आलेले लेखक, दिग्दर्शक आहेत. त्यांच्यासाठी ही कलाकृती म्हणजे आव्हानात्मक बाजू आहे. यातल्या कलाकारांना एका जागी उभे राहून आवाजाच्या, वाचनाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करायची आहे, त्यामुळे फक्त उत्तम वाचन ही कलाकारांच्या निवडी मागची संकल्पना नाही. उत्तम वाचनाबरोबर आवाजाचे बारकावे, प्रसंग अवधान यांचे भान ज्या कलाकाराकडे आहे. त्या कलाकाराची निवड या अभिवाचनासाठी केलेली आहे. त्यासाठी रितसर युवा रंगकर्मींना पत्रक पाठवले होते. त्यात अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. ज्या कलाकारांनी स्पर्धात्मक दर्जा सांभाळला, त्यांना इथे प्राधान्य दिले आहे. त्यांची कार्यशाळा घेतलेली आहे. सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा म्हणजे वेदना, संवेदना, प्रतिकार, तिरस्कार यांना सामोरे जाणे हे आलेच.


पहिल्यांदाच एक गोष्ट या प्रवासात होणार आहे. त्यांना बंदिस्त ठेवल्यानंतर ज्या लोखंडी साखळ्या, हातबेडी, कोलू, पायबेडी या गोष्टी कलाकारांना हाताळायला दिल्या होत्या. त्यामुळे तो क्लेशदायी अनुभव त्यांच्या वाचनात येणार आहे. जे आठ अभिवाचक कलाकार आहेत त्यात अभिजीत धोत्रे, अमृता कुलकर्णी, नवसाजी कुडव, जान्हवी दरेकर, शंतनू अंबाडेकर, मुग्धा गाडगीळ, कृंतक गायधनी या कलाकारांचा सहभाग आहे. सावरकरांची भाषा म्हणजे अवघड लांब पल्लेदार, त्यात दिग्दर्शकाने कोणतीही तडजोड केलेली नाही. जे लिहिले आहे, तेच मुद्राभिनयासह प्रेक्षकांपर्यंत तसेच्या तसे पोहोचले पाहिजे, हा आग्रह बांदिवडेकरांचा असल्यामुळे शब्दोच्चार मार्गदर्शनासाठी त्यांनी सुहास सावरकर यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. श्याम चव्हाण हे प्रकाशयोजना, संदेश बेंद्रे नेपथ्य आणि मयूरेश माडगांवकर यांच्याकडे संगीताची जबाबदारी सोपवलेली आहे. या संपूर्ण टीमकडून ठरवले तसे घडले, तर ‘माझी जन्मठेप’ म्हणजे खऱ्या अर्थाने गौरवांकित झेप ठरणार आहे.

Comments
Add Comment