आपला परिसर स्वच्छ, सुंदर, रहदारीयुक्त, फेरीवालामुक्त, प्रदूषणविरहित असा अरोग्यदायी असावा ही सर्वसामान्यांची अपेक्षा असते आणि ती रास्तही आहे; परंतु ही सर्वसाधारण अपेक्षा कधीही आणि कुठेही पूर्ण होताना दिसत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. पण आता ठाणेकर याबाबतीत नशीबवान ठरले आहेत असेच म्हणावे लागेल. राज्यात सत्ताबदल झाला आणि एक सच्चा ठाणेकर मुख्यमंत्री झाल्याने पहिला सकारात्मक बदल हा ठाणे परिसरात दिसून येणार ही अटकळ आता खरी होताना दिसत आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानाची हाक दिली आणि त्या अंतर्गत सौंदर्यीकरण, सुशोभीकरण, स्वच्छता, शौचालयांची स्वच्छता आदी गोष्टींना महापालिका कार्यक्षेत्रात दैनंदिन सुरुवात झाली असून हा बदल नागरिकांना आता दिसू लागला आहे. तसेच ठाणे स्टेशनच्या आवारातील १५० मीटर परिसरातील फेरीवाले हटविल्यामुळे पदपथ मोकळे झाले आहेत. दैनंदिन स्वच्छतेबरोबर आज ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात पूर्व व पश्चिम बाजूस ठाणे महापालिका आणि विविध संस्थांच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३ हे ‘विशेष स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले आहे.
या मोहिमेंतर्गत परिसर अस्वच्छ करणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व प्लास्टिक पिशव्यांचा साठा करणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई करून त्यांच्याकडून एकूण २२ हजार ७०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरच्या संपूर्ण परिसरावर जणू फेरीवाल्यांनी कब्जा केल्यासारखी अवस्था होती. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम परिसरात बेसुमार वाढलेले फेरीवाले आणि बेलगाम रिक्षावाले यांच्या कोंडीमुळे व दहशतीमुळे ठाणेकर जणू हलाखीच्या परिस्थितीत जीणे जगत होते. अखेर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ठाणे रेल्वे स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करण्यात यश मिळाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्थानक परिसरात पालिका, पोलीस, इतर यंत्रणा यांच्या साहाय्याने राबवत असलेल्या उपाययोजनांबाबत ठाणेकर समाधानी असून आयुक्तांना धन्यवाद देत आहेत. ठाणे स्टेशन परिसर कायमस्वरूपी फेरीवालामुक्त ठेवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने थातूरमातूर उपाययोजना करण्यापेक्षा एक भक्कम पाऊल उचलले आहे. या भागातील पदपथ रुंद करून त्यावर रेलिंग लावण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील फेरीवालामुक्त असलेले स्थानक म्हणून ठाणे हे महाराष्ट्रातील एकमेव स्टेशन ठरणार आहे. मुंबई-कल्याणवरून ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये दिवसाला १५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांना सकाळी आणि संध्याकाळी कामावरून येताना आणि जाताना फेरीवाल्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. रिक्षाचालकांची अरेरावी आणि दादागिरीचा सामना करावा लागत होता. विशेष म्हणजे फेरीवाला कायद्यान्वये रेल्वे स्टेशन परिसरात १५० मीटरपर्यंत धंदा करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे असतानाही दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड तसेच मालाड, कांदिवली, बोरिवली अशा अनेक रेल्वे स्थानकांच्या परिसरात रिक्षावाले अगदी फलाटांच्या जवळ पोहोचलेले आपण नेहमीच बघतो. त्यामुळे रेल्वे प्रवास करून थकून भागून घराकडे परतणाऱ्या प्रवाशांना आणि त्या परिसरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना अथवा बाहेरगावाहून सामान घेऊन ठाण्यात आलेल्यांना पदपथ आणि रस्त्यांवरून चालणे अत्यंत कठीण बनले होते. त्याबाबत महापालिका आयुक्त बांगर यांच्याकडे अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन पालिका प्रशासनाने स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करण्याची मोहीम पोलिसांच्या मदतीने राबविण्यास सुरुवात केली आणि अखेर त्याला यश आले आहे. पालिका प्रशासनाने स्टेशनच्या परिसरात दोन पाळ्यांमध्ये प्रत्येकी २० कर्मचारी तैनात केले आहेत. त्यांच्या मदतीला पोलीस देखील बंदोबस्त देत आहेत. त्यामुळे या भागातून फेरीवाले आता जवळजवळ गायब झाले आहेत. तसेच पादचाऱ्यांना नीट चालता यावे यासाठी या भागातील पदपथ रुंद करून त्याला उंच रेलिंग लावण्यात येणार आहेत. या बदलामुळे फेरीवाले पुन्हा बसू शकणार नाहीत. तसेच रिक्षाचालक देखील भाडे घेण्यासाठी रांग मोडणार नाहीत. आयुक्त बांगर यांनी अनेक गोष्टी मनावर घेतल्यामुळेच ठाणे रेल्वे स्टेशन परिसर फेरीवालामुक्त झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. खरं म्हणजे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षाचालकांना शिस्त लावण्याचे आव्हान पालिका आणि ठाणे पोलिसांनी यशस्वीपणे पार पाडले. गेले काही दिवस स्टेशन परिसरात रिक्षाचालक शिस्तीन प्रवाशांना सेवा देत आहेत. स्वच्छता, शिस्त ही जरी महापालिकेची जबाबदारी असली तरी प्रत्येक नागरिकाने याचे पालन करावे आणि जो कोणी गैरवर्तन करीत असेल, तर त्याला सर्वांनी वेळीच वठणीवर आणल्यास मोकळा श्वास घेत असलेले ठाणे स्थानकाचा आदर्श उर्वरित सर्व स्थानकांवर राबविणे सुकर होईल.