अलिबाग: मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील नऊ एकर जमिनीवर १९ बंगल्यांबाबत उद्धव ठाकरे यांच्याविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत सोमय्या हे गुन्हा दाखल करण्याबाबत प्रयत्न करीत होते. अखेर श्रीमती संगिता लक्ष्मण भांगरे, (ग्रामविकास अधिकारी मुरुड) यांच्या तक्रारीनुसार कोर्लई ग्रामपंचायत अधिकारी व तत्कालीन सरपंच, सदस्य यांच्या विरुद्ध फसवणूक, संगनमत, १९ बंगल्यांच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे ९ एकर जागा उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे खरेदी केली आहे. ही जमीन आर्किटेक्ट कै अन्वय नाईक यांच्याकडून २०१४ साली खरेदी केली आहे. या जागेत १९ बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वेळोवेळी केला आहे. याबाबत कोर्लई ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोमय्या पाठपुरावा करीत होते. रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती.
उद्धव ठाकरे यांनी मुखमंत्री असताना त्यांच्या दबावामुळे अधिकाऱ्यांनी कागदपत्रात छेडछाड केल्याचे सोमय्या यांचा आरोप आहे. त्यानुसार तत्कालीन ग्रामसेवक श्रीमती देवंगणा वेटकोळी, विनोद मिंडे, वेदिका म्हात्रे, तत्कालीन सरपंच प्रशांत मिसाळ, गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रीमा पिटकर आणि तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य यांच्या विरोधात फसवणूक, संगनमत, १९ बंगलो चे रेकॉर्ड मधे खाडाखोड करणे यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
एफआयआर क्रमांक २६, आयपीसी कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८ आणि ३४ अन्वये तत्कालीन तीन ग्रामसेवक, चार सरपंच आणि तत्कालीन सदस्य याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास मुपडे हे करीत आहेत.