पाटणा : दहशतवाद्यांकडे रॉकेट स्टिंगर मिसाईल असल्याच्या वृत्तामुळे उद्या होणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बिहारच्या दौऱ्यादरम्यान पाटणा ते पश्चिम चंपारणपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबत बिहारच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी राजधानी पाटणा आणि पश्चिम चंपारणच्या डीएम, एसएसपी आणि एसपींना पत्र पाठवले आहे. यामध्ये दहशतवाद्यांकडे असलेले रॉकेट स्टिंगर क्षेपणास्त्राने खास व्यक्तींच्या जीवाला धोका असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाने त्यांच्यासाठी हाय अलर्ट जारी केला आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक (सुरक्षा) यांनी पाठवलेल्या पत्रात महाबोधी मंदिरातून स्फोटके जप्त करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील फरार दहशतवाद्यांवर कारवाईच्या सुचना पोलिसांना दिल्या गेल्या आहेत. अशा स्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने बदल होण्याची शक्यता आहे.
छपराच्या मरहौरामध्ये लष्कर-ए-मुस्तफाच्या कमांडरला शस्त्रे पाठवल्याची कबुली स्फोट प्रकरणातील आरोपी जावेद आलम याने दिली आहे. यामध्ये त्याने स्टिंगर मिसाईलही असण्याची शक्यता व्यक्त केली. या अलर्टमध्ये हेलिपॅडबाबतही चर्चा करण्यात आली असून ते मानकांनुसार बनवावेत, असे सांगण्यात आले आहे. दहशतवाद्यांकडे रॉकेट स्टिंगर मिसाईल असल्याच्या वृत्तानंतर धोका वाढणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. यामुळे हेलिपॅड परिसरात पोलिसांची सतत गस्त राहणार आहे.