प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीची ताकद पणाला
पुणे: राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षात जनाधार नेमका कोणाच्या बाजूने आहे, याचे चित्र कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील निकालात उमटणार आहे. त्यामुळे आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी येथील महाविकास आघाडी आणि भाजप-शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
आज संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबला. त्याआधी रोड शो करुन, सभा घेऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय नेत्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी महात्मा फुले वाड्यापासून रोड शो झाला. तर चिंचवड मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अश्विन जगताप यांच्यासाठी प्रचार रॅली आणि बैठका घेतल्या. नाना काटे यांच्यासाठी अजित पवार यांनीही चिंचवडमधे रोड शो केला.
कसबा आणि चिंचवड निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष ताकदीनिशी प्रचार सभा, बाईक रॅली आणि पदयात्रेवर भर दिला. कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार झाला. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्यासाठी भाजप तसंच महाविकास आघाडीने दमदार जोर लावला. शिवाय इथे बंडखोर राहुल कलाटे यांनीही शक्तीप्रदर्शन केले.