मुंबई: सध्या सोशल मिडियावर सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री असा मजकूर असलेल्या पोस्टर्सची जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे फोटो लावलेले या मजकुरासोबतचे पोस्टर्स मुंबईत काही ठिकाणी लावण्यात आले होते. या पोस्टरगिरी बाबत सुप्रिया सुळे यांनी नाराजी दर्शवत मुंबई पोलिसांनी लवकरात लवकर पोस्टर लावणाऱ्याचा शोध घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी विनंती केली आहे.
आज बारामती दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या, ‘एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावण्याचा अधिकार कोणालाही नाही. हे पोस्टर कोणी लावलं, याचा पुरावा असला पाहिजे’, असेही सुळे यावेळी म्हणाल्या.
‘उद्या तुमच्या कुटुंबातील पत्नी, मुलीचा असा फोटो लागला तर तुम्हाला चालेल का?’ असा प्रतिप्रश्न सुळे यांनी यावेळी केला. पोस्टरबाबत पत्रकारांकडूनच मला माहिती मिळाली. ते पोस्टर कोणत्या पक्षाने लावले आहेत का? याची माहिती मुंबई पोलिसांनी मिळवावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या पोस्टरवरही प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील यांचे पोस्टर त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावले होते. मात्र माझ्या आणि अजितदादांच्या पोस्टरमध्ये साम्य आहे. दोन्ही पोस्टरवर पोस्टर लावणाऱ्याचं नाव नाहीये. त्यामुळे हा आमच्या दोघांवर अन्याय आहे.
सुप्रिया सुळे सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या तेथील गावांना भेटी देत आहेत.
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील माळेगाव बुद्रुक ता:बारामती येथे गावभेट उपक्रमाअंतर्गत भेट दिली. यावेळी ग्रामस्थांसोबत संवाद साधला.
याप्रसंगी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीनाना होळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. pic.twitter.com/elZq72E0ou
— Supriya Sule (@supriya_sule) February 23, 2023