Wednesday, April 23, 2025
Homeक्रीडाविराट कोहली झाला अलिबागकर ६ कोटींचा टोलेजंग बंगला केला खरेदी

विराट कोहली झाला अलिबागकर ६ कोटींचा टोलेजंग बंगला केला खरेदी

अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबागच्या निसर्ग सौंदर्याची सर्वानाच भुरळ पडते. मग त्याला उद्योजक, राजकारणी, अभिनेते किंवा क्रिकेटर अपवाद नाहीत. येथे अनेक उद्योजक, राजकारणी व अभिनेत्यांचे बंगले आहेत. आता त्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि जगविख्यात क्रिकेटर विराट कोहलीची भर पडली आहे. अलिबाग आवासमध्ये आवास लिव्हिंग अलिबाग एलएलपी या बंगलो प्रोजेक्टमध्ये त्याने ६ कोटींचा अलिशान बंगला खरेदी केला आहे. विराटचा भाऊ विकास कोहलीने हा खरेदी व्यवहार गुरुवारी २३ फेब्रुवारीला अलिबाग दुय्यम निबंधक कार्यालयात विराटच्या वतीने पूर्ण केला. त्यामुळे सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, अजित वाडेकर, ईशांत यांच्यानंतर आता विराट कोहलीही अलिबागकर झाला आहे.

अलिबाग येथे आवास लिव्हिंग अलिबाग एलएलपी याचे बंगलो प्रोजेक्ट आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात हा प्रकल्प आहे. अनेक कलाकार, क्रिकेटर या प्रकल्पात बंगले खरेदी करीत आहेत. अभिनेता राम कपूर व गौतमी कपूर यांनीही या प्रकल्पात २ घरे खरेदी केली आहेत. विराट कोहलीही या प्रकल्पाचा भाग बनला आहे. विराटने तब्बल ६ कोटींना घर खरेदी केले आहे. सध्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. त्यामुळे विराट या घर खरेदीला उपस्थित राहू शकला नाही. परंतु त्याच्या भावाने हा खरेदी व्यवहार विराटच्या वतीने पूर्ण केला. यात आवास लिव्हिंग प्रकल्पाचे अलिबागमध्ये १७ वर्षांपासून जमिनीविषयी कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत असलेले ॲड. महेश म्हात्रे यांनी सर्व कागत्रपत्रीय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. मुंबईपासून स्पीड बोटच्या सोयीमुळे १५ मिनिटाच्या अंतरावर हा आवास प्रकल्प आहे. निसर्गरम्य परिसर, अत्याधुनिक सोयीसुविधा तेथे उपलब्ध आहेत. त्यामुळे तेथे बडे उद्योजक, व्यापारी, राजकारणी घरे खरेदी करत आहेत. विराटने खरेदी केलेला बंगला २ हजार चौरस फुटांचा आहे. त्यात ४०० चौरस फुट तरण तलाव आहे. त्यामुळे आता विराटही अलिबागकर झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -