Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीएमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार

एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार

विद्यार्थ्यांची मागणी मान्य, पुण्यात जल्लोष

पुणे : एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) मान्य करण्यात आली आहे. नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून पुण्यात आंदोलन सुरू होते. राज्य लोकसेवा आयोगाने हा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांकडून पुण्यातील झाशीची राणी चौकात जल्लोष साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने याबाबतचा निर्णय ट्वीट करून जाहीर केला. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत असल्याचे आयोगाने म्हटले.

मागील अनेक वर्षांपासून पुण्यात किंवा राज्यभर विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. दोन वर्ष कोरोना असल्याने या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर परीक्षांच्या तारखा देखील लवकर जाहीर झाल्या नाहीत. या सगळ्यांमुळे विद्यार्थी संतापले होते. त्यानंतर नवा पॅटर्न लागू करणार असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले होते.

सोमवारपासून (२० फेब्रुवारी) पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे उपोषण आंदोलन सुरु होते. गेल्या दोन महिन्यातील हे तिसरे आंदोलन होते. जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत सरकारने नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. मात्र, हा निर्णय घेऊन तीन आठवडे उलटले असूनसुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले होते. सरकारने आश्वासन देऊनही आदेश न काढल्याबद्दल विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी, २१ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा आंदोलनस्थळी जात आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. विद्यार्थ्यांची मागणी योग्य असल्याचे त्यांनी म्हटले होते. आंदोलन स्थळावरून शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती. या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असे सांगत त्यांनी हे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते.

शरद पवार यांच्या आवाहनानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र, आंदोलनावर ठाम राहिले. अधिकृत घोषणा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर आज राज्य लोकसेवा आयोगाने घोषणा केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -