ठाणे : ठाण्यातील वॉकरवाडी भागात एका लग्न सोहळ्यात वधूची आई लग्न लागल्यानंतर स्टेजवर फोटो काढण्यास गेली. तेवढ्या वेळात चोरट्याने स्टेजवरील दागिन्यांनी भरलेली बॅग लांबवली.
ठाण्यातील उथळसर प्रभाग समितीजवळ असलेल्या वॉकरवाडी ग्राउंडवर एका विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. लग्नसोहळा व्यवस्थित पार पडल्यानंतर नवरीची आई मुलीच्या लग्नामध्ये घेऊन आलेली दागिने भरलेली बॅग स्टेजजवळ ठेऊन फोटो काढण्यासाठी स्टेजवर चढली. त्याचवेळी संधीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने ती दागिन्यांनी भरलेली बॅग घेवून पोबारा केला.
आपण स्टेजवळ ठेवलेली बॅग गायब झाल्याचे नवरीच्या आईच्या लक्षात येताच तिने बोंबाबोंब केली.
दरम्यान, अज्ञात चोरट्याविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक एम. एस. खणकर अधिक तपास करीत आहेत.