- माझे कोकण: संतोष वायंगणकर
महाराष्ट्रात शिवसेना कोणाची? हा प्रश्न कधी उपस्थित होईल याचा साधा विचारही कधी कोणी केला नसेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मराठी माणसाची असं गेल्या चाळीस वर्षांतलं समीकरण होऊन गेलेलं होतं. भगवा झेंडा आणि धनुष्यबाण, वाघ ही सगळी शिवसेना ओळखण्याची चिन्हच होती. यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेची ही या पद्धतीची ओळख आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावर चालणारी आणि वाढलेली शिवसेना सत्तेची पायरी चढल्यावर त्याला राजकारणाचा स्पर्श झाला. तत्पूर्वी रक्तदान, कुठे अपघात झाला की शिवसेनेची रुग्णवाहिका सुसाट धावायची. कोणाला कुठेही रक्ताची गरज लागली की, तिथला शाखाप्रमुख रक्तदाता उपलब्ध करून द्यायचा. कोणत्याही सर्वसामान्याचे काही काम कुठल्या शासकीय कार्यालयात अडकले असेल तर त्यासाठी धावणारा शहरातला शिवसैनिक असायचा.
मुंबईत काम करणाऱ्या लोकाधिकार समितीने हजारो तरुणांना तेव्हा नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या. त्या काळी शिवसेनेत असलेल्या कै. विठ्ठल चव्हाण, खा. गजानन कीर्तीकर, आताचे केंद्रीयमंत्री नारायण राणे, आ. छगन भुजबळ, सुधीर जोशी यांच्यासारख्या नेत्यांनी स्टेट बँक, बीएसटी, महानंदा अशा अनेक ठिकाणी शेकडो तरुणांना काम दिले, उभे राहण्याची संधी दिली. ही सामाजिक बांधिलकी, १९९५ साली सत्तेवर असलेल्या शिवसेनेत होती. २००५ नंतर चित्र बदलत गेले. समाजकारणाचे ब्रिदवाक्य सांगणारी शिवसेना शंभर टक्के राजकारणी झाली. शिवसेनेतील उपक्रमशीलता कमी होत गेली. परोपकारी वृत्ती कमी झाली. कडवट असलेले शिवसेना नेते या ना त्या कारणाने शिवसेना सोडून गेले. यानंतर २०१९ साली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कधीही न जमणारं राजकीय समीकरण मांडलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेला हा महाविकास आघाडीचा निर्णय कडवट शिवसैनिकांना कधीच रुचला नव्हता; परंतु मनातील नाराजी कोणी ओठावर येऊ दिली नाही. न पटणारी ही महाविकास आघाडी अनेकांनी स्वीकारली.
आठ महिन्यांपूर्वी दुभंगलेल्या शिवसेनेच्या दुफळीची बीजे २०१९ मध्ये महाविकास आघाडी शिवसेना सत्तेत सहभागी झाली त्याचवेळेला पेरली गेली होती. मात्र शिवसेना सत्तेवर येतेय त्याचा निश्चितच आनंद सर्वांना होता; परंतु शिवसेना सत्तेवर; परंतु सत्तेचा उपयोग शिवसैनिकांना आणि सर्वसामान्यांना कधीच होऊ शकला नाही. नंतरच्या काळात त्याची सुप्त चर्चाही होत राहिली. काहींनी ती उघडपणेही नाराजी बोलून दाखवली; परंतु शिवसेनेचे काहीही झाले तरीही चालेल; परंतु राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दुखवायचे नाही अशाप्रकारचे धोरण शिवसेनेतील खा. संजय राऊत यांसारख्यांना वाटत राहिले. तशी काळजीही त्यांनी घेतली. त्याचा व्हायचा तोच परिणाम आठ महिन्यांपूर्वी झाला. शिवसेना पूर्णपणे दुभंगली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन ४० विद्यमान आमदार आणि १३ खासदारांनी महाविकास आघाडीच्या सत्तेतून बंड केले. संपूर्ण महाराष्ट्राच या राजकीय बदलत्या समीकरणाने हादरला. शिवसेनेला मग एकावर एक धक्के बसत गेले. त्याची कारणेही तशीच आहेत. ‘खोके आणि ओके’ म्हणत त्या सर्वांना डिवचण्याचेच काम झाले. साहजिकच त्यातून दुभंगलेली मनं एकसंध होण्याऐवजी कायमची दुभंगली. दरी वाढत गेली. चुकलं तरी त्याचं समर्थन करत फिरणाऱ्यांमुळे शिवसेनेतील हा दुरावा अधिकच वाढत गेला. तो कमी करण्याचा प्रयत्नच झाला नाही. न्यायालय, निवडणूक आयोग यांमध्ये शिवसेना कोणाची, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या वादावरही निवडणूक आयोगाने शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निवाडा केला आणि मग पुन्हा एकदा शिवसेना, धनुष्यबाण याविषयीची चर्चा सुरू झाली.
राजकारणामध्ये खरं तर अशी स्थित्यंतरे होतच असतात; परंतु मुळात झालेली चूक समजून घ्यावी लागते. आपलं काही चूकलंच नाही असे वाटणारे आणि बोलणारे नेते पक्षप्रमुखांच्या अवती-भवती असताना यातून पुढे कसे जाणार असा प्रश्न साहजिकच कुणालाच पडणार नाही. आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकताच वाटत नसेल तर मग त्यातून सुधारणा घडण्याची शक्यताही नसते. शिवसेना आणि कोकण यांचं एक नातं होतं. बऱ्या-वाईट काळातही कोकण सोबत होते; परंतु आता कुणावर विश्वासून सोबत राहायचं? असा प्रश्नच कोकणातील जनतेच्या मनात आहे. शिवसेनेत आणि सेनेत कोकणात कर्तबगारीने काही करू शकतील, असे नेतेच शिवसेनेत नाहीत. मातोश्रीप्रती बेगडी निष्ठा सांगणारे दिसतात. ते देखील केवळ पलीकडे कोणी विचारत नाहीत असेच. यामुळे हाती मशाल घेतलेली शिवसेना आणि धनुष्यबाण हाती असलेली शिवसेना त्यांच्यातील संघर्ष आणि राजकारण कोकणात यापुढच्या काळात असेल असे वाटते.