
ठाणे (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहर बालेकिल्ला असून ठाणे शहरातच शिवसेना पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय असणार आहे. शिवसेना पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय म्हणून ठाण्यातील आनंद आश्रमाची निवड करण्यात आली आहे.
शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांचे कार्यालय आणि निवासस्थान असलेले आनंद आश्रम लाखो शिवसैनकांचे श्रद्धास्थान आहे. या वास्तूला शहरातील शिवसेना पक्षाच्या राजकारणात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. याच आनंद आश्रमातून धर्मवीर आनंद दिघे न्यायनिवाडा करत, ज्या वास्तूतून अनेक महत्वाचे राजकीय डावपेच आखले जात होते. परंतु त्याची पडझड झाल्यानंतर त्याच्या दुरुस्तीचे काम मागील काही वर्षापासून सुरू आहे. आता हे काम जवळ जवळ पूर्ण झालेले आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांचे निवासस्थान नव्याने नावारूपाला येत आहे धर्मवीर आनंद दिघे यांच्या निवासस्थान आनंदमठ या नावाने प्रसिद्ध आहे. आता शिंदे गटाकडून शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय म्हणून या आनंदमठाचे नाव देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने प्रति शिवसेना भवन उभारण्याच्या हालचाली केल्याच्या चर्चा होत्या. आता मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यासाठी शिंदे गटाकडून पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ताच बदलण्यात आला आहे. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील शिवसेना भवना ऐवजी ठाण्यातील आनंद आश्रम हा पत्ता देण्यात आला होता. शिंदे गटाकडून जाहीर झालेल्या नियुक्त्यांच्या पत्रावर नवा पत्ता टाकण्यात येत होता. परंतु शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाकडून अधिकृतपने प्राप्त झाल्यानंतर आंनंद आश्रमच शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आतापर्यंत दादरच्या शिवसेना भवनाचा उल्लेख शिवसेना मध्यवर्ती कार्यालय म्हणून असायचा. मात्र शिंदे गटा कडून करण्यात येणाऱ्या पक्षांतर्गत नियुक्तीच्या पत्रावर ‘आनंद आश्रम, श्री भवानी चौक, टेंभी नाका, ठाणे पश्चिम’ हा पत्ता दिसत आहे.
उद्धव ठाकरे मागील महिन्यात ठाणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला हार घातला. जैन समाजाचा कार्यक्रम हजेरी लावली. आरोग्य शिबिरात गेले. पण धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रममध्ये गेले नाही. सत्ता संघर्षानंतर शिंदे गटाकडून ठाण्यातील आनंद आश्रम नाव बदलले आहे. बाळासाहेबांची शिवसेना आनंद आश्रम असे आनंद आश्रमला नव्याने नाव देण्यात आले होते. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर अधिकृत शिक्कमोर्तब केल्यानंतर शिवसेना या पक्षाचे कार्यालय म्हणून आनंद आश्रमची निवड करण्यात आली आहे.