
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सलग तीन दिवस सुरू असलेली सुनावणी आज एक तास आधीच संपली. आता पुढची सुनावणी २८ फेब्रुवारी पासून होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्या. पी.एस. नरसिंहा या ५ जणांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
पुढच्या आठवड्यात पुन्हा तीन दिवस सुनावणी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता शिंदे गटाचा युक्तिवाद पुढच्या आठवड्यात होणार आहे. त्यानुसार ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सत्तासंघर्षावरील सुनावणी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ही त्यांची चूक असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण सरन्यायाधीशांनी यावेळी नोंदवले. जर, बहुमत चाचणीला सामोर गेला असता तर आम्ही ती चाचणी रद्द ठरवली असती, असेही कोर्टाने यावेळी स्पष्ट केले आहे.
आजच्या सुनावणीमध्ये बहुमत चाचणी, राज्यपालांनी घेतलेली भूमिका या सर्व घटकांवर जोरदार युक्तिवाद झाला.
अडीच दिवसांच्या युक्तिवादाची सिब्बलांकडून भावनिक सांगता
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या आज तिस-या दिवशी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जवळपास अडीच दिवस युक्तिवाद केला. आजही (२३) त्यांच्याच युक्तिवादाने कामकाजाची सुरुवात झाली. आजही कपिल सिब्बल यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. युक्तिवादादरम्यान सिब्बल यांनी तत्कालीन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या कार्यप्रणालीवर सवाल उपस्थित केले. मी ही केस जिंकेन किंवा हरेन.. त्यासाठी इथे उभा नाही, तर घटनात्मक नैतिकता टिकून राहावी, जी आपण देशात १९५० पासून रुजवत आलो आहोत, यासाठी मी उभा आहे, असे म्हणत त्यांनी आजच्या युक्तिवादाची भावनिक सांगता केली.
ठाकरे गटाकडून जवळपास अडीच दिवस अॅड. कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. आज सुरुवातीला कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर ठाकरे गटाकडून अॅड. अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद केला. आज एक तास आधीच सुनावणी संपली.