डोंबिवली (वार्ताहर) : डोंबिवलीतील उद्यान आणि नाना-नानी पार्क चोरीला गेल्याचा अर्ज भाजपचे माजी नगरसेवक मुकुंद पेढणेकर यांनी पोलीस उपायुक्तांना केला आहे. तसेच महसूल विभागाकडेही लेखी अर्ज करण्यात आला आहे. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक दोन दिवस उपोषण करणार आहेत.
नागरिकांसाठी आरक्षित असलेल्या उद्यान, मनोरंजनाचे मैदान, नानी-नानी पार्क या जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. २०१७ पर्यंत अस्त्विवात असणारे नाना-नानी पार्क इतर ठिकाणी हटविण्यात आले. एका विकासकाने दोन वेगवेगळ्या विकासकांना टी.डी.आर देण्याचे काम पालिकेच्या संबंधित विभागाकडून केल्याचा आरोपही भाजपचे माजी नगरसेवक मुकुंद (विशू) पेढणेकर यांनी केला आहे.
याबाबत भाजपचे माजी नगरसेवक पेडणेकर यांनी प्रशासकीय संस्थाना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, नागरिकांसाठी आरक्षित असलेले उद्यान नानी-नानी पार्क विकासकाने देणे आवश्यक होते. बाजूकडील साई राज पार्क नावाच्या इमारतीच्या भूखंडावर मनोरंजनाचे मैदान आरक्षित होते. त्या बदल्यात विकासकाने महापालिकेस कागदोपत्री १५ गुंठे आकारमानाचे ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान’ विकसित करून महापालिकेस हस्तांतरित केले. महापालिकेच्या मालमत्ता विभागातही एकूण १५ गुंठे आकारमानाच्या भूखंडाची ताबा-पावती बनविण्यात आली. परंतु प्रत्यक्षात जागेवर मोजणी केली असता उद्यान फक्त ९ गुंठे इतक्यात आकारमानाचे भरले. येथेही महापालिकेची फसवणूक केली असून एक टी.डी.आर. घोटाळा असल्याचा आरोप माजी नगरसेवक पेडणेकर यांनी केला आहे.
दरम्यान, महापालिकेच्या वतीने मिळालेल्या सुविधांपासून नागरिक वंचित राहू नयेत यासाठी आयरे रोड येथील अंबिका धाम सोसायटी समोर २५ व २६ असे दोन दिवस नागरिकांसह लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक पेडणेकर यांनी दिला आहे.