नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने नौदल, लष्कर आणि हवाई दल या भारताच्या तिन्ही दलांमध्ये अग्नीवीर योजनेअंतर्गत तरुणांच्या भरती प्रक्रियेत बदल केले आहेत. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १७ ते २१ वर्षे निश्चित करण्यात आली होती, मात्र आता केंद्र सरकारने या योजनेच्या नियमात बदल केला आहे. आता नवीन नियमांनुसार, आयटीआय आणि पॉलिटेक्निक पास युवकही अग्निवीरच्या पदांसाठी अर्ज करू शकतात. यामुळे अधिक तरुणांना प्रोत्साहन मिळेल असा सरकारला विश्वास आहे.
आयटीआय आणि पॉलिटेक्निक उत्तीर्ण तरुणांना लष्कराच्या तांत्रिक शाखेसाठी अर्ज करु शकतात. त्याचबरोबर सरकारने प्रशिक्षणाची वेळही कमी केली आहे.
अग्निपथ योजनेअंतर्गत, भारतीय सैन्यात अग्निवीरांच्या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १६ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते भारतीय लष्कराच्या joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा ऑनलाइन अर्ज भरू शकतात.
या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२३ निश्चित करण्यात आली आहे. या तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराकडून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भारतीय लष्कराने जारी केलेल्या भरती अधिसूचनेनुसार, अग्निवीर जनरल ड्युटी, टेक्निकल क्लर्क, स्टोअर कीपर, ट्रेड्समन या पदांवर भरती केली जाईल.
या दिवशी भरती परीक्षा होणार आहे
अग्निवीर निवड प्रक्रियेत बदल केल्यानंतर, आता उमेदवारांना प्रथम लेखी चाचणी उत्तीर्ण करावी लागेल, त्यानंतर त्यांना शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की लेखी परीक्षा १७ एप्रिल २०२३ रोजी घेतली जाईल.