नवी दिल्ली (वृत्तसंस्था): राष्ट्रीय अधिवेशनासाठी रायपूरला निघालेल्या काँग्रेस नेते पवन खेरा यांना गुरुवारी दिल्ली येथे विमानातून उतरवण्यात आले. त्यानंतर आसाम पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, खेडा यांच्या अटकेविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी ३ वाजता यावर सुनावणी होणार आहे.
काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख असलेले पवन खेरा, यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळं भाजपनं खेरा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. दिल्ली विमानतळावर उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आसाममध्ये पवन खेरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
काँग्रेसने खेडा यांना विमानातून उतरवून अटक करण्याच्या कृतीला सरकारची हुकूमशाही असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे जयराम रमेश यांनी या अटकेबाबत विधान करताना म्हटले, ‘प्रथम ईडीने रायपूर येथे छापा टाकला, आता पवन खेरा यांना पोलिसांनी रायपूरहून एअरलिफ्ट केले आहे. हुकूमशाहीचे दुसरे नाव म्हणजे अमित शाही”. ते पुढे म्हणाले, ‘मोदी सरकारला आमचे राष्ट्रीय अधिवेशन उधळून लावायचे आहे. पण, आम्ही घाबरत नाही. आम्ही देशवासीयांसाठी लढत राहू’.
काय आहे प्रकरण?
पवन खेरा यांनी अदानीच्या मुद्यावर पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्यामध्ये त्यांनी “अटलबिहारी वाजपेयींनी संयुक्त संसदीय समिती बनवली होती मग नरेंद्र गौतम दास मोदी यांना काय अडचण आहे”, असं म्हटलं होतं. पवन खेरा यांच्या त्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झालं होतं. भाजपनं पवन खेरा यांच्या विरोधात आंदोलन देखील केलं होतं.