पुणे : शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात शिक्षक म्हणून नोकरी देण्याच्या बहाण्याने तब्बल ४५ जणांची लाखो रुपये घेऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही फसवणूक खुद्द पुणे जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षणाधिकारी आणि परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी आणि त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे यांनी केल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोघांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सांगली जिल्हयातील एका ५० वर्षीय शिक्षकाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शैलजा रामचंद्र दराडे-खाडे या परिक्षा परिषदेच्या आयुक्त आहेत. त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याने तक्रारदार यांना बहीण शैलजा दराडे या शिक्षण विभागात वरिष्ठ पदावर काम करत असून शिक्षक म्हणून नोकरी देण्याचे त्यांनी खोटे सांगून त्यांच्याकडे लाखो रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांच्या दोन वहिनींना शिक्षक पदावर नोकरी लावतो असे सांगत, त्यांच्याकडून प्रत्येकी १२ लाख रुपये आणि १५ लाख रुपये असे एकूण २७ लाख रुपये घेतले.
यानंतर फिर्यादी हे कधी नोकरी लागणार या आशेने त्यांना कॉल करत होते. मात्र, त्यांना आरोपीने उडवाउडवीची उत्तर दिली. यामुळे त्यांनी पैसे परत मागितले. मात्र, वारंवार मागणी करूनही आरोपींनी फिर्यादिला पैसे परत केले नाही. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दिली.
दरम्यान आरोपींनी अशाच प्रकारे ४५ जणांची फसवणूक केल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. थोरबोले करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणी शैलजा दराडे म्हणाल्या, हा प्रकार भावाने केला आहे. त्यांच्या पदाचा फायदा हा त्याने स्वत:च्या फायद्यासाठी करून घेतला. हा प्रकार समजल्यावर त्यांनी भावाशी सर्व संबंध तोडले होते. दादासाहेब दराडे हा सख्खा भाऊ असल्याचा गैरफायदा घेऊन लोकांना कामे करुन देण्याबाबत सांगत असल्याने त्यांनी त्याच्याशी संबंध तोडलेले आहे. त्यामुळे दादासाहेब दराडे भाऊ असल्याच्या नात्याने कोणीही त्याच्याबरोबर कसलाही व्यवहार करु नये, अशी जाहीर नोटीस त्यांनी ऑगस्ट २०२० मध्ये दिली होती.