- फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे
आजपावेतो अनेक लेखाच्या माध्यमातून आपण वैवाहिक आयुष्याला बरबाद करणारे विवाहबाह्य संबंध, त्यामुळे उद्ध्वस्त होत असलेली कुटुंब, वैयक्तिक हानी यावर ऊहापोह केलेला आहे. मूलतः विवाहबाह्य संबंध कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिले तरी चुकीचेच आहेत आणि त्याचा परिणाम विपरितच होतो हे सर्वश्रुत आहे. तरीही अनेकजण यामध्ये पूर्णतः गुरफटलेले आहेत. अशा अनैतिक संबंधांमागे कारण काहीही असो, त्यामुळे अनेकजण गोत्यातच आलेले आहेत. अशा संबंधांना अनेक घटनांमध्ये वेगळे चुकीचे अनाकलनीय वळण मिळून त्यातून अधिक चुकीची वाटचाल करण्यापर्यंत आजकाल समाजाची मजल गेलेली दिसते. एक स्त्री आणि एक पुरुष जेव्हा एकमेकांशी अनैतिक संबंध प्रस्थापित करतात तोपर्यंत तो त्या दोघांचा व्यक्तिगत वैयक्तिक प्रश्न असतो आणि ही बाब दोघांपुरतीच मर्यादित असते, असे आपण गृहीत धरतो. ही गोष्ट कुटुंबाच्या-समाजाच्या नजरेला चोरून केली जाते, अशी आपली मानसिकता असते.
समुपदेशनाला काही अशी विचित्र प्रकरणं येतात की, माणूस आजमितीला किती खालच्या पातळीवर उतरला आहे आणि कोणत्या हीन दर्जाच्या अपेक्षा रिलेशनशिपमध्ये ठेवू लागला आहे, हे समजल्यावर थोडीही लज्जा, मर्यादा, भान आपल्याला राहिले आहे की नाही? हा प्रश्न निर्माण होतो. नीता (काल्पनिक नाव) अजय (काल्पनिक नाव) दोघांचे एकमेकांशी विवाहबाह्य संबंध मागील सहा महिन्यांपासून सुरू होते. नीताला पतीपासून न मिळणारे प्रेम, आदर अजयकडून मिळाल्याने ती बऱ्यापैकी गांभीर्याने त्यांच्या नात्यात गुंतली होती. नीता जेव्हा समुपदेशनला आली, तेव्हा ती प्रचंड तणावात होती आणि पूर्णपणे हादरून गेलेली होती. नीताचे म्हणणे होते, अजय तिला त्याच्या इतर मित्रांशी पण शारीरिक संबंध प्रस्तापित करण्यासाठी दबाव आणतो आहे. ‘तू जर माझ्यासोबत राहू शकते, तर तुला माझे मित्र का चालणार नाहीत तू कुठे फार पतिव्रता आहेस? इतकी नाटक आणि नखरे करायला’, असं बोलून अजयने नीताच्या भावनांना सुरुंग लावला होता. तिला विनाकारण मानसिक, भावनिक दडपण अजय आणत होता.
या गोष्टीला निताने साफ नकार दिल्यावर अजयने तिच्यासमोर जो प्रस्ताव ठेवला, त्यामुळे तर ती अधिक घाबरून गेली होती. अजयचे म्हणणं होते, ‘तुझ्या कोणी मैत्रिणी असतील, तर त्यांना तरी पटव माझ्या मित्रांसाठी. आपण सगळेच मिळून मजा करत जाऊ. आपण पार्टनर पण एक्स्चेंज करत जाऊ आणि तुला पण ते खूप आवडेल. तू किती मागासलेल्या विचारांची आहेस, आजकाल सगळेच असं करतात’, असं बोलून अजय नीताचे सतत मन वाळवायचा प्रयत्न करत होता. अजय सातत्याने नीताला तिच्या मैत्रिणींशी बोलून त्यांना तयार करण्यासाठी तिच्या मागे लागत होता. या अशा स्वरूपाच्या अपेक्षा नीताला अजिबात अपेक्षित नसल्याने तिला खूप मानसिक त्रास होत होता. अजयशी संबंध तोडून टाकावेत, तर नीता त्याच्यात भावनिक, मानसिकरित्या पूर्ण गुंतलेली होती. त्यामुळे तिला तसं करणं ताबडतोब शक्य होत नव्हतं. तिचं म्हणणं होतं, माझ्या कोणत्याही मैत्रिणीला माझे आणि अजयचे संबंधसुद्धा माहिती नाहीत, सगळ्या अत्यंत चांगल्या घरातल्या सुस्वभावी, संस्कारी मैत्रिणी आहेत माझ्या. अजयचं म्हणणं होतं तू अशी आहेस, तर तुला अशाच मैत्रिणी असतील, ज्यांना इतर पुरुषांमध्ये इंटरेस्ट आहे. हे ऐकून नीता प्रचंड दुखावली गेली होती. मी कोणत्या भावनेने अजयच्या जवळ आले आणि हा किती खालच्या दर्जाचा माणूस निघाला, यावर नीता स्वतःला दोष देत होती.
याही पलीकडे जाऊन नीताला नुकतेच अजयचे अजून दोन-तीन महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा दाट संशय येत होता. अजय प्रेमाच्या नावाखाली तिला फसवतोय, तिचा गैरफायदा घेतोय, याचा तिला खूप धक्का बसला होता. अजय तिचे फोटो त्याच्या मित्रांनासुद्धा पाठवतोय. ते तिच्या फोटोवर एकत्र असताना वाटेल त्या कमेंट्स करतात, हे नीताला जाणवत होतं. इतर महिलांचे विचित्र अवस्थेतील फोटो व्हीडिओदेखील अजयच्या मोबाइलमध्ये येत असतात, हे नीताचे निरीक्षण होते. नीता नसेल, तेव्हा अजय इतर महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवणे, त्या स्वरूपाचे चॅटिंग, व्हीडिओ कॉल इतर महिलांना करणे हे सगळं नीताच्या लक्षात आले होते. रात्री दोन-तीन वाजताचे अजयचे लास्ट सीन मोबाइलवर पाहून, त्याची इतर महिलांशी फोनवर वागण्या-बोलण्याची पद्धत पाहून नीता समजून चुकली होती की, अजय एकावेळी अनेक महिलांना वेड्यात काढतोय. अजयच्या दोन-तीन चांगल्या मित्रांनी नीताला फोन करून नुकतेच सांगितले होते की, अजय सगळ्या मित्रांमध्ये बसल्यावर ओळखीच्या लोकांसमोर नीताबद्दल खूप अर्वाच्य आणि अश्लिल भाषा वापरून बोलत असतो. नीताबद्दल अपमानास्पद शब्द, शिव्या अजय वापरत असतो हेही तिला अजयच्या मित्रांनी सांगितले होते. नीताने या गोष्टीचे स्पष्टीकरण अजयला विचारले असता अजयने तिला उडवाउडवीची उत्तरे देऊन ते मित्र माझ्यावर जळतात, त्यांना आपलं रिलेशन पाहवत नाही, त्यांना कोणी भेटत नाही ना असं मैत्री करायला म्हणून ते आपल्याला तोडायचा प्रयत्न करतात, असं सांगून सावरासावर केली होती.
अजयच्या मनात आपल्याबद्दल थोडेही प्रेम अथवा आदर नाही, हे समजल्यामुळे नीताला खूप मनस्तापातून जावं लागत होतं. तिच्याबद्दल तिच्या पाठीमागे अजयकडून बोलले गेलेले शब्द तिला सहन होण्यापलीकडले होते. नीताने आपलं अजयवर खरंच मनापासून प्रेम आहे, बाकी या कोणत्याही गोष्टीत आपल्याला काहीही रस नाही हे त्याला समजावायचा खूप प्रयत्न केला होता. पण अजय तिला इतकं चीप समजू लागला होता की तिच्या बोलण्याला तो थोडीही किंमत देत नव्हता. नीताने अनेकदा नकार देऊनही अजय सतत तिच्यामागे लागला होता की, ‘तुझी मैत्रीण पण बघ नं, मला ओळख करून दे, माझी भेट घालून दे, मला तिच्या घरी ने, मला तिचा फोन नंबर दे, माझ्या मित्रालाही बदल हवा आहे म्हणून एवढी मदत कर. आपण सगळेच फिरायला जाऊ, एन्जॉय करू.’ सर्वसामान्य आणि सरळ वैचारिक समज असलेल्या नीतासाठी या मागण्या अतिशय खालच्या थराच्या होत्या. तू जर अफेअर करू शकतेस, असे संबंध ठेऊ शकतेस, तर तूझ्या ओळखीत अशा कितीतरी गरजू अथवा शारीरिक सुखाला इच्छुक महिला असतील, ज्या तयार होतील, असा विचार मनात ठेऊन अजय नीताला सतत भरीला घालत होता. समुपदेशनला आलेल्या नीताची सहनशक्ती संपली होती. तिला आता अजयशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नव्हते. नीताच्या मनात त्याच्याबद्दल भीती बसली होती की, तिच्या बाजूने संबंध तोडल्यावर अजय तिला ब्लॅकमेल करेल का, अजय तिच्या नवऱ्याला, तिच्या घरी काही सांगेल का? तिचे फोटो व्हीडिओ अजून कुठे व्हायरल करेल का? अजयचे मित्र तिला भविष्यात त्रास देतील का? तिच्या मैत्रिणींना शोधून तर अजय किंवा त्याचे मित्र काही त्रास देणार नाहीत ना?