Tuesday, March 18, 2025
Homeमहत्वाची बातमीगुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त अवघ्या १०० रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा

गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त अवघ्या १०० रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १०० रुपयांत आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. तर अकोले तालुक्यातील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ५ हजार १७७ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ मिळणार आहे.

यापूर्वी दिवाळीत आनंदाचा शिधा देण्यात आला होता. राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. एकनाथ शिंदेंना पक्षचिन्ह आणि शिवसेना नाव मिळाल्यावर पहिली बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद आणि अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो चनाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी ई-पासद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पासची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल. हा आनंदाचा शिधा देण्याकरता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधा जिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279 प्रति संच या दरानुसार, 455 कोटी 94 लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी 17 कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार, 182 गावांना सिंचनाचा लाभ

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी 5177.38 कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे 68 हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे.

प्रवरा नदीवर निळवंडे गावाच्या वरील बाजूस हे दगडी धरण बांधण्यात येत असून धरणातून डावा कालवा सुरू होऊन तो 85 कि.मी. लांब आहे. नदीच्या उजव्या तीराने जाणारा कालवा 97 कि.मी. आहे. या दोन्ही कालव्यातून 68 हजार हेक्टर सिंचन होणे अपेक्षित आहे. 2027 पर्यंत या प्रकल्पाचे कालव्यासह संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होताच अकोले, संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अवर्षणप्रर्वण भागातील 182 गावांना सिंचनाचा लाभ होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -