इगतपुरी (प्रतिनिधी): जिंदाल कंपनीला लागलेल्या आगी प्रकरणी सात जणांवर घोटी पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
एक जानेवारी रोजी, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथील जिंदाल कंपनीमध्ये मोठ्या स्वरुपात आग लागली होती. या घटनेमध्ये तीन कामगार महिमा कुमारी प्रल्हाद सिंग, अंजली रामकुबेर यादव, सुधीर लालताप्रसाद मिश्रा हे मयत झाले होते व २२ कामगार जखमी झाले होते. घोटी पोलीस स्टेशन येथे या घटनेबाबत अकस्मात मृत्यु तसेच अकस्मात जळीत दाखल करण्यात आले होते. अकस्मात जळीताची चौकशी सपोनि खेडकर हे करीत होते.
या अकस्मात जळीताचे चौकशीचे अनुषंगाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, व संबंधित विभागांना पत्रव्यवहार करुन अहवाल मागविण्यात आले होते. त्याचबरोबर कंपनीचे सेफ्टी ऑडीट रिपोर्ट व इतर कागदपत्रे प्राप्त करण्यात आली होती. सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता, ज्या बॅच पॉली प्लॅन्टमध्ये प्रथमतः आग लागली होती, तो बॅच पॉली प्लॅन्ट हा सुमारे दिड महिन्यांपासुन बंद होता. हा प्लॅन्ट सुरु करण्यापुर्वी त्याची तपासणी व दुरुस्ती होवुन, तो सुरु करताना एस ओ पी चे पालन न केल्याने, प्लॅन्टमधून थर्मिक फ्लुईड ऑइलची गळती होवुन हि आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा तपास नाशिक चे उपविभागीय पोलीस अधिकारी, ग्रामीण अर्जुन भोसले हे करीत आहेत.