Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेपूर्वीच्या कचरा कुंड्या चांगल्या होत्या!

पूर्वीच्या कचरा कुंड्या चांगल्या होत्या!

जागोजागी उभ्या राहणाऱ्या कचऱ्याच्या आरसी गाड्यांच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये कचराकुंडी मुक्त शहर ही संकल्पना देखील राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहरातील कचराकुंड्या हटवून त्याठिकाणी घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करण्यात येतो. मात्र पूर्वीच्या कचरा कुंड्या चांगल्या होत्या असे बोलण्याची वेळ नागरिकांवर आली असून जागोजागी उभ्या राहणाऱ्या कचऱ्याच्या मोठ्या आरसी गाड्या आणि घंटा गाड्यांच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत शिवसेना उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांनी घन कचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांचे याकडे लक्ष वेधत या गाड्या हटविण्याची मागणी केली आहे.

कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क, टेलीफोन एक्स्चेंज, फडके मैदान, तसेच इतर अनेक मुख्य ठिकाणी संध्याकाळी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कचरा उचलणाऱ्या मोठ्या आरसी गाड्या आणि घंटा गाड्या उभ्या असतात. या मोठ्या आरसी गाड्यांमध्ये इतर अनेक घंटा गाड्या कचरा आणून टाकत असतात. हा कचरा टाकतांना बराचसा कचरा, दुर्गंधीयुक्त पाणी सुद्धा खाली सांडते. रात्रभर या गाड्या याठिकाणी उभ्या असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तर अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या हटविल्याने आणि वेळेवर घंटागाड्या येत नसल्याने नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत असून या आधी कचरा हा कचरा कुंडीच्या आसपासच पडायचा मात्र आता १५ ते २० फुटांपर्यंत कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असते.

याबाबत उपायुक्त अतुल पाटील यांना वारंवार सांगून देखील यावर कारवाई होत नसल्याने आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष देण्याची मागणी मोहन उगले यांनी केली आहे.

याबाबत मोहन उगले यांनी उपायुक्त अतुल पाटील यांची भेट घेतली असता, अशा प्रकारे रस्त्यावर कचरा गाड्या उभ्या न करता पालिकेच्या आरक्षित भूखंडावर या गाड्या उभ्या करण्याच्या सूचना संबंधित विभागाला केल्या आहेत. तरी देखील गाड्या रस्त्यावर उभ्या असलेल्या आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -