Thursday, April 24, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखतपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, येवती

तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, येवती

सेवाव्रती: शिबानी जोशी

मराठवाड्याने जे अनेक संघ कार्यकर्ते घडवले, ज्यांनी राष्ट्रीय स्तरावर जाऊन आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला अशातले प्रामुख्याने नाव घेता येतील असे राष्ट्रीय नेते म्हणजे प्रमोद महाजन होत. प्रमोद महाजन हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील. प्रमोद महाजन यांचे वडील व्यंकटेश हाडाचे शिक्षक होते. तसंच स्वतः प्रमोदजींनीही काही वर्षं शिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. शिक्षण हे विकासाचे मुख्य माध्यम आहे. ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या मुलांना त्यांच्या घराजवळ शिक्षणाची गंगा पोहोचवली, तर त्यांची प्रगती कोणीही रोखू शकत नाही, त्यामुळे शिक्षणाची गंगा शेवटपर्यंत पोहोचावी, असं म्हणणाऱ्यांपैकी प्रमोद महाजन होते.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूने वडिलांच्या नावाने शिक्षण क्षेत्रात काहीतरी करावं म्हणून त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर ज्ञानदानाचे कार्य १९९९मध्ये चालू झाले. “लोकहितार्थ ज्ञानसाधना” हे ध्येयविधान डोळ्यांसमोर ठेवून शैक्षणिक संस्था उभी राहिली. तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची त्यासाठी स्थापना करण्यात आली आणि ट्रस्टतर्फे उस्मानाबाद येथे व्यंकटेश महाजन कला, विज्ञान, वाणिज्य व बीसीए वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आले.

तपस्वी पब्लिक चरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून राष्ट्रीय विचाराने प्रेरित अनेक जण एकत्र येऊन १९९५ मध्ये काम सुरू झाले. शिक्षणाचा शस्त्र म्हणून वापर करून सर्वसामान्यांची समृद्धी साधता येते. “शस्त्र शास्त्र संभृतं भवतु भारतम्” हे सूत्र समोर ठेवून ही वाटचाल सुरू झाली. प्रमोदजींच्या कन्या विद्यमान खासदार पूनम महाजन-राव या सध्या अध्यक्ष, तर महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील सचिव म्हणून काम पाहत आहेत. भारताचे पहिले माहिती-तंत्रज्ञान मंत्री प्रमोद महाजन यांच्या दूरदृष्टीतून ९ जुलै १९९९ पासून इथे महाविद्यालय सुरू झाले. उस्मानाबाद येथे व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय आणि व्होकेशनल महाविद्यालय या शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आल्या. त्यासाठी प्रमोद महाजन यांनी उदात्त हेतूने त्यांचीच वडिलोपार्जित जमीन दान केली व तिथे ज्ञानदानाचे कार्य सुरू केले.

इथे दर्जेदार शिक्षणाबरोबर अत्याधुनिक शिक्षण देण्यासाठी एल. सी. डी. प्रोजेक्टर सुविधेसह ३ ई-क्लासरूम उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयातील म्युझियम, ई-लायब्ररी, सुसज्ज जिम ही इथली खास वैशिष्ट्ये आहेत. अभ्यासू व होतकरू मुलींसाठी वसतिगृहाची सोय करून देण्यात आली आहे. तरुण आणि उच्च विद्याविभूषित असा शिक्षकवृंद महाविद्यालयात आहे. विद्यार्थ्यांना भारताचा सक्षम व संस्कारक्षम नागरिक बनविण्यासाठी शिक्षक वर्ग सतत धडपडत असतो. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि सामाजिक अशा सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक संकुलातील प्रत्येक घटक प्रयत्न करतो. याच दृष्टिकोनातून महाविद्यालयात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. महाविद्यालयात केवळ उत्तम शिक्षण देणे एवढे एकच उद्दिष्ट नसून ट्रस्टतर्फे सामाजिक बांधिलकीही जपली जाते. प्रमोदजी महाजन यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय स्तरावरील व्याख्यानमाला ठेवली गेली, ज्यात अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रिकर, गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, राजीव खांडेकर यांच्यासारखे दिग्गज नेते, पत्रकार येऊन मार्गदर्शन करून गेले आहेत.

तपस्वी ट्रस्ट आणि राज्य ग्रामीण विकास संस्था, मुळाशी यांनी संयुक्तपणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शेतकरी मित्र मंच (शेतकरी मित्र)ची स्थापना केली आहे. या केंद्राच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आर्थिक संकटामुळे आत्महत्या केलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. कोविड-१९ महामारीग्रस्त उस्मानाबाद शहरातील अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी इतर आवश्यक वस्तूंसह धान्य असलेने ‘किराणा कीट’ देण्यात आले होते. त्याशिवाय जिल्ह्यातील रक्तदान शिबिरामध्येही सहभाग नोंदविण्यात येतो. दरवर्षी महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर व कॅन्सर रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. वर्षभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व राष्ट्रीय जाणिवा विकसित केल्या जातात. राष्ट्रीय सेवा योजना एनएसएसच्या माध्यमातून श्रमसंस्कार शिबीर आयोजित केले जाते. महाविद्यालयात क्रीडा विभाग असून सर्व साधनांनी युक्त अशी जिम (व्यायामशाला) विद्यार्थ्यांसाठी सदैव खुली असते. विभागाच्या वतीने महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. तसेच विविध स्पर्धांत अनेक विद्यार्थ्यांना पाठवलं जातं यापैकी अनेक खेळाडूंना आतापर्यंत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाविद्यालयात सध्या ७०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच या विद्यार्थ्यांसाठी उच्चशिक्षित असे पन्नास शिक्षक व इतर कर्मचारी ज्ञानदानासाठी झटत आहेत. महाविद्यालयाला बी प्लस नेक मूल्यांकन मिळालं आहे. तसेच आदर्श परीक्षा केंद्राचा पुरस्कारही कॉलेजला लाभला आहे.

शिक्षक असलेल्या आपल्या पित्याच्या नावानं शिक्षक असलेल्याच एका राष्ट्रीय नेत्यांने उभारलेल्या महाविद्यालयातील शिक्षण आदर्शच असणार हे महाविद्यालयाला मिळालेले सन्मान पाहून लक्षात येते.संस्थेच्या व्होकेशनल महाविद्यालयात मेडिकल लॅब टेक्निशियन, एक्स रे टेक्निशियन, ओडिटिंग अँड अकौंटिंग हे किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम चालतात. या ट्रेड्सच्या माध्यमातून आजवर शेकडो विद्यार्थ्यांना रोजगार मिळालेला आहे. ज्ञानदानाबरोबरच रोजगार उपलब्ध करून देणार व शिक्षण महाविद्यालयात दिले जाते. विद्याभारती उच्चशिक्षा संस्थांशी महाविद्यालय जोडलेले आहे. त्यामुळे विविध राष्ट्रीय परिषदांचे आयोजन, सहभाग, त्याचसोबत नव्या शैक्षणिक धोरणाशी निगडित अनेक उपक्रमात महाविद्यालय सहभागी असते.

कोविड कालखंडात ऑनलाइन पद्धतीने तासिका प्रभावीपणे राबविणारे हे जिल्ह्यातले पहिले महाविद्यालय होते. गुगल क्लासरूम व गुगल मिटच्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करणे, विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा घेणे, विद्यार्थ्यांना हे माध्यम समजून सांगणे, शिक्षकांचे प्रशिक्षण करणे असे विविध प्रयोग कोविड काळात करण्यात आले. त्याशिवाय धाराशिवमध्येच लोकसेवा समिती ही आणखी एक समविचारी संस्था आश्रम शाळा, बालवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजही चालवते. त्याची माहिती आपण पुढील लेखात घेऊया.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -