ठाणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाज बांधवांवर जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ठाणे यांच्याकडून वारंवार अन्याय होत होता. विशेष करून ठाणे येथील दि. जी. पावरा, उपायुक्त तथा सहआयुक्त, जात पडताळणी समिती, ठाणे यांच्याकडून पूर्वग्रह दूषित निर्णय दिले जात होते. त्यामुळे सिंधुदुर्गातील ठाकर समाजातील विद्यार्थी व कर्मचारी यांच्यावर अवैध ठरून उच्च न्यायालयात धाव घेण्याची वेळ येत होती. उच्च न्यायालयाकडून तात्काळ सकारात्मक निर्णय होत होते. मात्र या सर्वात ठाकर समाज बांधवांची प्रचंड आर्थिक हानी होत होती.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांनी आज मंगळवारी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची मंत्रालयात भेट घेतली. भेटीदरम्यान अन्यायकारक उपायुक्त पावरा यांची तात्काळ बदली करण्याचे आश्वासन गावित यांनी राणे साहेबांना दिले तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर बांधवांवर कोणताही अन्यायकारक निर्णय लादला जाणार नाही याची हमी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच मुंबई स्थित सर्व ठाकर समाज बांधवांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहेत, तसेच आनंद व्यक्त केला आहे.