सिंधुदुर्गनगरी (वृत्तसंस्था) : आपला पेशा पत्रकारितेचा आहे, त्याचं पावित्र्य टिकवणं हा आपला धर्म आहे. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी विधायक, विकासात्मक कार्यकर्तृत्वाची ऊर्जा मराठी पत्रकारितेतून दिली आहे. आपण काय योगदान देतोय याचाही विचार व्हायला हवा. त्यासाठी समाज प्रबोधन होऊन समाजाच्या विकासाचे प्रगतीचे विषय भवनातून हाताळले जावेत, अशी अपेक्षा केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाचे उद्घाटन फित कापून तसेच कोनशिला अनावरण करुन बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन केंद्रीय मंत्री नारायणराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर जिल्हा नियोजन समिती नवीन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री राणे बोलत होते.
केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, आज राज्यभरातील पत्रकारांसाठी एक हक्काचे दालन सज्ज झाले आहे. या स्मारक व भवन उभारण्या पाठीमागे सर्व पत्रकारांचे योगदान आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाकडे पाहून चांगले गुण आत्मसात करावेत. पत्रकारितेत त्यांनी सांगितलेलं पावित्र्यं जोपासले आहे का? आंगिकारले आहे का? त्याचा अंमल होतो आहे का? याचा विचार मंथनातून व्हावा. त्यावेळची पत्रकारिता, आताची कुठे गेली? याचाही विचार व्हायला हवा. पत्रकारिता हे आयुध आहे. त्यासाठी अभ्यास लागतो. विकास बेकारी, जीडीपी, उद्योगधंदे, रोजगारावर वृत्तपत्रातून मार्गदर्शन व्हायला हवे, त्यासाठी आवश्यक पोषक वातावरण बनवणं पत्रकारांचं काम आहे. पत्रकार परिषदेत विकासावर प्रश्न असावेत. जिल्ह्याच्या विकासाला पोषक, समृध्दीचं वातावरण निर्माण करावं, समाजाला प्रेरणा देऊन उत्तेजन देवून, समाजाचं प्रबोधन करुन समाजाच्या विकासाचे प्रगतीचे विषय भवनातून हाताळले जातील, लिहिले जातील, असं काम व्हायला हवं. आपला जिल्हा देशात समृध्द जिल्हा म्हणून ओळखला जावा. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा पुढे नेऊया: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांनी करावे. हे पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे ठरेल. या ज्ञान मंदिराचे पावित्र्यं जतन करुन बाळशास्त्री जांभेकराच्या पत्रकारितेचा वारसा पुढे नेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी होत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनच्या उद्घाटन प्रसंगी केले.
पत्रकारितेत झालेल्या बदलांची दखल पत्रकारांनी घ्यावी: आमदार नितेश राणे
आमदार नितेश राणे म्हणाले, काळानुरुप पत्रकारितेत झालेल्या बदलांची दखल जिल्ह्यातील पत्रकारांनी घ्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या पत्रकार भवनात व्हावा. या भवनातून विचार मंथन होऊन विकासात्मक पत्रकारिता घडत जावी. जिल्ह्यात एक दर्जेदार पत्रकार भवन उभे रहावे, अशी सर्व पत्रकारांची इच्छा होती ती आज यानिमित्ताने पूर्णत्वास आली आहे.प्रास्ताविकात जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा पत्रकारितेचा वारसा कथन केला. या स्मारकासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील पत्रकारितेचा इतिहास सांगितला आणि पत्रकार भवन उभारणी सहाय्य केलेल्या सर्व पत्रकार, प्रशासन व पक्षाचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करुन या भवनाची पुढील वाटचालीचा संदर्भ दिला.