Wednesday, April 30, 2025

महामुंबईराजकीयमहत्वाची बातमी

विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला!

विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला!

मुंबई : विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले. त्यानंतर आज शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला. याआधी ठाकरे गटाचा या कार्यालयावर ताबा होता. येथे असलेले बोर्ड आणि बॅनर हटवण्यात आले आहेत. त्यानंतर भरत गोगावले यांनी आमदारांसह या कार्यालयावर ताबा घेत म्हटले की, "आता शिवसेना हा आमचा पक्ष आहे. यापुढे इतर कार्यालये ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणार आहे."

दरम्यान, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. त्यांचा हा उन्माद हा असाच असणार आहे. आम्ही यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेलो पण ते याची वाट पाहायला कुठे तयार असणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच आम्ही याबाबत भूमिका घेणार आहे. सध्या वाद घालण्यात अर्थ नाही. परंतु कार्यालयाचा ताबा घेण्याआधी त्यांनी विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेतली का? की घुसखोर म्हणून गेलेले आहेत? जर त्यांना परवानगी दिली नसेल तर त्यांनी केलेल्या घुसखोरीवर विधानसभा अध्यक्ष काय कारवाई करणार, असे सवाल खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केले.

तर दुसरीकडे "आम्ही विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतलेला नाही तर प्रवेश केला आहे. त्यासाठी आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया बाबी पूर्ण केल्या आहेत. हे शिवसेना पक्षाचे कार्यालय आहे आणि आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही तयारी केली आहे. कार्यालय ताब्यात घेण्यासाठी आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया भरत गोगावले यांनी पूर्ण केली आहे," अशी प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी दिली.

Comments
Add Comment