
सुधागड -पाली (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील पराक्रमी सरदार हैबतराव देशमुख यांची वंशावळ सापडली आहे. मुंबईच्या दहिसर येथील इतिहास संशोधक संदीप परब यांना ही वंशावळ शोधण्यात यश आले आहे. त्यामुळे इतिहासातील इतर काही घटनांचा शोध लागण्याची शक्यता आहे. इतिहास संशोधकांच्या दृष्टीने हा एक महत्वाचा टप्पा आहे.
सुधागड तालुक्याचे वैभव असलेल्या हैबतराव देशमुख घराण्याची मोडी लिपीतील वंशावळ तिवरे येथे वास्तव्यास असलेल्या रोहित देशमुख यांना भालगुल येथील मुन्ना देशमुख यांच्या जुन्या कागदपत्रात सापडली. सदर मोडी वंशावळीचे दहिसर, मुंबई येथे राहणारे इतिहास संशोधक संदीप मुकुंद परब यांनी मराठीत रुपांतर करून सदर वंशावळ ही हैबतराव घराण्याचीच असल्याचे सिद्ध करण्यात यश मिळवले आहे. इतिहास अभ्यासक व संशोधक संदीप परब यांनी मोडी व मराठीत लिहिलेला ‘सुधागड तालुक्यातील हैबतराव देशमुख यांची वंशावळ’ हा शोध निबंध ‘हेमाद्री’ या मोडीलिपीतील दहाव्या अंकांत प्रसिद्ध करून इतिहास प्रेमी, अभ्यासक व संशोधक यांच्या समोर ठेवला आहे. उपरोक्त वंशावळ सन १९१७ साली भालगुलवाडीतील आबाजी श्रीपत देशपांडे कुलकर्णी यांनी लिहिलेली असून सदर वंशावळीत मौजे तिवरे येथील सरदार संभाजी हैबतराव देशमुख यांचाही उल्लेख केला आहे. यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना हैबतराव देशमुख घराण्यातील वीर पुरुषांनी मृगगड किल्ला हस्तगत करण्याकरिता मदत केली होती. त्याकरिता त्यांना महाराजांनी दहिगाव हा गाव इनाम दिला होता, असेही इतिहास अभ्यासक व संशोधक संदीप परब यांनी सांगितले.
संशोधनात या गोष्टींचा झाला फायदा
हैबतराव घराण्यातील भोर संस्थानात कार्यरत असलेले कै. पिलाजीराव देशमुख मौजे दहिगाव, तिवरे, कान्हवली आणि आधारणे येथे वास्तव्यास असलेली हैबतराव घराणी, मौजे तिवरे येथील सरदार संभाजी हैबतराव देशमुख यांची समाधी व ऐतिहासिक साधनातील त्यांच्या नोंदी. तसेच वंशावळीत उल्लेख केलेला मृगगड किल्ला या सर्व बाबी सदर वंशावळ सिद्ध करण्यास फार उपयोगी ठरल्या संदिप परब यांनी सांगितले