नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई इंडियन्सला ५ वेळा आयपीएलच्या जेतेपदाचा चषक उंचावून देणारा रोहित शर्मा सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून निवडला गेला आहे. आयपीएलच्या प्रवासाला १५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका क्रीडा वाहिनीने इनक्रेडिबल पुरस्कार जाहीर केले.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड सर्वोत्कृष्ट कर्णधारापासून ते सर्वोत्कृष्ट फलंदाजापर्यंत एकूण ६ श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार सर्वोत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सला मिळाला. या प्रकारात त्याने सुरेश रैना, ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले. जसप्रीत बुमराहला आयपीएलचा आतापर्यंतचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निवडण्यात आले. या पुरस्काराच्या शर्यतीत बुमराहसह सुनील नरेन, राशिद खान आणि युजवेंद्र चहल यांचाही समावेश होता.
सर्वोत्कृष्ट एकूण प्रभावशाली खेळाडू हा पुरस्कार वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलने पटकावला. वेगवान फलंदाजी आणि गोलंदाजीत महत्त्वाच्या प्रसंगी विकेट्स घेत या खेळाडूने आपल्या संघाला अनेक वेळा कठीण परिस्थितीत सामने जिंकून दिलेत. विंडीजच्या या खेळाडूने शेन वॉटसन, राशिद खान आणि सुनील नरेन यांना या पुरस्कारात मागे टाकले. एका मोसमातील सर्वोत्तम फलंदाजी या पुरस्कारासाठी विराट कोहलीची निवड करण्यात आली. विराटने आयपीएल २०१६ मध्ये ९७३ धावा केल्या होत्या.